Your Own Digital Platform

बळीराजाचे राज्य येऊ दे...


स्थैर्य, फलटण : टाळ मृदुंगाच्या गजराच आळंदीहून विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा काल सायंकाळी ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. माऊलींचा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ‘राज्यात वरुणराजाची कृपा होऊन बळीराजाचे राज्य येऊ दे’ असे श्रीमंत संजीवराजेंनी माउलींना साकडे घातले.

विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...ग्यानबा तुकाराम’ सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुरकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा काल दिनांक 15 रोजी महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी विसावला. दरम्यान आज दि.16 रोजी हा पालखी सोहळा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाकरीता बरड येथे विसावणार आहे.

तरडगाव येथून प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी 6:00 वाजता फलटण शहरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलींद नेवसे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, पोलीस उप अधिक्षक अभिजीत पाटील, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील आदी मान्यवरांनी स्वागत केले.

माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सद्गुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, शामराव निकम, गोविंदराव शिंदे, दशरथ यादव, महादेव यादव, अजित पेटकर, सचिन पेटकर, श्रीकांत पेटकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी माऊलींच्या पादुकांना पुष्पहार घालून दर्शन घेतलेे. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. वारीत चालणार्‍या लाखो वारकर्‍यांपासुन शहर व तालुक्यातील गावकर्‍यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणकरांनी मोठ्या रांगा लावल्या. 

यावेळी पावसाने पालखीचे आधीच हजेरी लावली असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा वारीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांची संख्या अधिक आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते. 

पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकर्‍यांचे सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जरघोष व भगव्रा पताका यामुळे अवघे शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकाणी मोफत चहा, सरबत, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय वारकर्‍यांसाठी करण्यात आली होती. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते.

दरम्यान वारकर्‍यांना अडचणी येवु नयेत या करीता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली. वारकर्‍यांसाठी पिण्यास पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर तात्पुरत्या स्वरुपात शौचालये व स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. पुरवठा विभागाच्या वतीने पालखी तळावर गँस सिलेंडर व रॉकेल उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकर्‍यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगर पालीकेच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला होता. टपाल खात्याच्यावतीने मोबाईल पोस्ट ऑफीस व तिकीट विक्री केंद्र पालखी तळानजिक उभारण्यात आले होते. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने संवाद वारीचे आयोजन करण्यात आले होते. या संवादवारीमध्ये प्रदर्शन, पथनाट्य, भारुड व गोंधळ या विविध उपक्रमांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत होती. या संवादवारीसाठी सातार्‍याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी जिल्ह्यातील संवादवारीला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले. 

या पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने फिरत्या ए.टी.एम.ची सोय करण्यात आली होती. या सुविधेचा हजारो वारकर्‍यांनी लाभ घेतला. 

शहरातील वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शहराच्या बाहेर बस थांब्यांचे नियोजन केले होते. त्यानुसर गोंदवले, शिंगणापूर कडे जाणार्‍या एस.टी. बसेस कोळकी येथून, आसू, गुणवरे कडे जाणार्‍या एस.टी. बसेस गोविंद डेअरीसमोर, बारामतीकडे जाणार्‍या एस.टी. बसेस सोमवार पेठ येथून तर सातारा, पुणे कडे जाणार्‍या एस.टी. बसेस मुधोजी महाविद्यालय परिसरातून रवाना केल्या जात होत्या. 

आज सोमवार दिनांक 16 जुलै रोजी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंपरद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी दाखल होणार आहे. बुधवार दिनांक 28 जुन रोजी हा वैष्णवांचा मेळा दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.