पंढरीच्या वारीसाठी युगान् युगे निघतोय मेळा... विठू माझा लेकुरवाळा


सातारा : पंढरीची वारी ठराविक तिथीला निघते, आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही, वर्गणी नाही, सक्ती नाही, पण विणेकर्‍याच्या भोवती दिंडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, भाविक किती, सगळं काही ठरवल्यासारखं. विठूनामाचा गजर करत सारे कसे एका लयीत नाचत पंढरीकडे जात असतात. यात कोणालाही त्याची जात विचारली जात नाही, कोणालाही त्याचे कूळ विचारले जात नाही.

 भगवंतांवर अपार श्रद्धा असलेल्या माय-भगिनींही माऊलींच्या कोंदणातच आयुष्याचं सर्वस्व गोंदून विठ्ठल भक्‍तीत तल्लीन होवून जात आहेत. आज माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. त्याच्या स्वागतासाठी ‘ज्ञानोबा... तुकोबा...’ असा गजर करत तयार होऊ या...संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणजे राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी व गरीब शेतकर्‍यांची वारी म्हणून आषाढी वारी ओळखली जाते. आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात शेतकरी आपली शेतातील मशागतीची कामे करून पेरण्याही पूर्ण करून दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतो. देहू व आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या वेळीच मोठ्या संख्येने वारकरी म्हणून सहभागी होऊन ‘भेटी लागी जिवा..’ असे अभंग रचत पंढरीची वाट धरत असतात.

दिंडीत फक्त माणूस श्रेष्ठ मानला जातो. हरतर्‍हेचे वारकरी, अगदी शेतकर्‍यापासून ते उच्चपदस्थापर्यंत सारेच कसे तल्लीन झालेले पहावयास मिळतात. लाखोंच्या संख्येने वारकरी सारे भेदभाव विसरत एकत्र येतात, एकत्रीकरणातून आपला धार्मिक आनंद साजरा करतात. सावळ्या विठ्ठलाला आपल्या मनामनात साठवतात आणि प्रत्येक वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच संबोधत मार्गक्रमण करत असतो. वारी म्हणजेच सर्वस्व, सारं काही माऊलींसाठी. या वारीत अबालवृध्द देहभान हरपून तल्लीन झालेले असतात. पावलोपावली अडचणी अन् समस्या सोबतीला असूनही भक्‍तीच्या वाटेवर त्याचा लवलेशही कुठे जाणवत नाही. डोळ्यासमोर असतो तो फक्‍त कमरेवर हात ठेवलेला ‘आपला भगवंत’. वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्‍याची ही भावना म्हणूनच प्रत्येक वारकर्‍यातून जणू संतांचीच अनुभुती येते. म्हणूनच पंढरीच्या या वारीने भक्‍तीचा महिमा आणखी गडद करून ठेवला आहे.

अडचणींना अंगाखांद्यावर खेळवत मार्गक्रमण

कशाची अन् कसलीही पर्वा न करता देवाच्या नावाचा अखंड जप करीत हे वारकरी विठ्ठल भेटीला निघाले आहेत. त्यांचा उत्साह व श्रद्धा सगळंच काही थक्क करून टाकणारं आहे. एवढे तल्लीन होऊन ते नामस्मरण करतात की कोणत्याही प्रकारच्या अडचणींची तमाच बाळगली जात नाही.

कपडे कसे बदलणार, स्वयंपाक कुठे करायचा, कसा करायचा? सारंच काही अवघड गणित. मात्र, एकदा का वारीत तल्लीन झाला की सगळं काही आपोआप होत जातं. जणू काही भगवंतच प्रत्येक अडचणीला आपल्यासोबत उभा राहतो. वारीतील हा अनुभव खूप काही शिकवून आणि सांगून जातो.

No comments

Powered by Blogger.