Your Own Digital Platform

बेंदूर सणासाठी दहिवडी आठवडा बाजार सजला


गोंदवले :  बेंदूर सण दोन दिवसांवर आला असल्याने दहिवडी आठवडा बाजारात खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू होती. बाजारात वस्तूंची रेलचेल झाली होती. शेतकरीसुध्दा आपल्या लाडक्‍या जनावरांसाठी या वस्तूंची खरेदी करत होते. मात्र, बाजारात मंदीचे सावट असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

आषाढी एकादशीनंतर दोन दिवसांनी बेंदूर सण असतो. वर्षभर बळीराजाला शेतीच्या कामात अतोनात सहाय्य करणाऱ्या मुक्‍या जनावरांना यादिवशी कामातून विश्रांती मिळते. या मुक्‍या जनावरांना लागणारे साहित्य आज दहिवडीत बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्यात सुती नायलॉन दावी, नायलॉनच्या पट्टीच्या आकारातील मुस्की गळ्यातील वेगवेगळे कंडे, पायातले चाळ, शिंगांना घातले जाणारे शोभेचे साहित्य, झूल, वेसण असे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाला होते.

लहान मोठ्या आकाराचे घुंगुरू असणाऱ्या गळ्यातील कंड्याना त्याचबरोबर विविध रंगांनी आकर्षक सजवलेल्या रेशमी गोंडे असलेली गळ्यातील माळ, शंख आकारातील गळ्यातील कंडे, लहान घंट्या यांच्या कंड्यांना खूप मागणी होती. त्यांना रंगवण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे इकोफ्रेंडली रंगही बाजारात दाखल झाले आहेत. 

शिंगांना लावण्यासाठी लागणाऱ्या शेंब्या, काळे गोफ, काजळ, तोरणे यांनी बाजार फुल्ल झाला होता. गळ्यातील कंडे 50 ते 140 रुपये, रेशमी गोंडे 40 ते 70, सूत 130 रुपये किलो, नायलॉन 160 रुपये किलो नायलॉन रस्सी 70 ते 110 नग, कातडी बेल्ट 40 ते 170 नग पट्टी नायलॉन म्होरकी 70 रुपये होती. रंगाचे डबे 40 रुपयांपासून 200 रुपयांच्यापर्यंत होते. पावडर रंग 20 ते 60 पर्यंत पाकीट होते. अशाप्रमाणे या बाजारात लाखोंची उलाढाल झाली आहे.