कोयनेत यंदा कमी पावसाची नोंद


पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरण परिसरात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जून महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये धरणात तब्बल 5 टीएमसी पाण्याची कमी आवक झाली आहे. जूनअखेर धरणात 30 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 75 टीएमसी पाण्याची गरज आहे. कोयना धरणावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची विजेची व सिंचनाची गरज भागवली जाते. त्याचबरोबर पूर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील सिंचनाची गरजही याच धरणातील पाण्यावर भागवली जाते. स्वाभाविकच जून महिन्यात पहिल्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला, तर वर्षभराची चिंता मिटते. मात्र, चालू वर्षी पावसाने जून महिन्यात अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

जून महिनाअखेर धरणात 30.01 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्‍त साठा हा 25.01 टीएमसी इतका आहे. पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आत्तापर्यंत 3.53 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. तर सिंचनासाठी धरणातून 1.73 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर 159.800 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणात केवळ 5.63 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी संपूर्ण जून महिन्यात धरणात 10.52 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यामुळेच गेल्या वर्षीपेक्षा पाच टीएमसीने पाण्याची आवक कमी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी जूनअखेर धरणात 26.20 टीएमसी पाणीसाठा होता. तर पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 1.98 पाणी वापरण्यात आले होते. त्याचवेळी 1.77 टीएमसी पाणी वापरत 92.125 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली होती.

स्वाभाविकच या सर्व तांत्रिक व नैसर्गिक गोष्टींचा विचार लक्षात घेता या महिन्यात अपेक्षित पाऊस पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्यस्थितीत पाणीसाठा हा निश्‍चितच समाधानकारकही नाही. मात्र येणार्‍या काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास मात्र चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते.

No comments

Powered by Blogger.