Your Own Digital Platform

फरारी खंडणीबहाद्दरास अटक ; तीन दिवसाची पोलिस कोठडी


उंब्रज : भोसलेवाडी, ता. कराड येथील तारळी नदीपात्रात माती मिश्रित वाळू उपशावर नंग्या तलवारी नाचवत 50 हजार रुपयांची खंडणी मागत खिशातील 20 हजार रुपयांची रोकड लुटल्या प्रकरणी दोन महिन्यापासून फरारी संशयित आरोपीला उंब्रज पोलीस व कराड तालुका गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तरित्या सापळा रचून पलूस, ता. सांगली येथून अटक केली. त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तन्वीर अली पटेल (वय 26) रा. वाघेरी, ता. कराड असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

भोसलेवाडी, ता. कराड येथील तारळी नदीपात्रात सुरु असलेल्या मातीमिश्रीत वाळू उपशावर गुरुवार, दि. 17 मे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी उंब्रज पोलीसांत आठ जणांवर दरोडा व खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. तर तन्वीर पटेल हा पोलिसांना गुंगारा देत होता. 

पोलीसांना संशयित तन्वीर पटेल हा सांगली जिल्ह्यातील पलूस येथे एका घरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी उंब्रज पोलीसांचे पथक तयार करून कराड तालुका गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक भापकर यांच्या सह डिबीचे पोलिस कर्मचारी यांनी संयुक्त रित्या रविवारी रात्री पलुस येथील एका घरात सापळा रचून तन्वीर पटेल याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यास कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तन्वीर पटेल रा. वाघेरी ता. कराड यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे