Your Own Digital Platform

बाटेवाडी गावावर कड्याची टांगती तलवार


चाफळ : चाफळ विभागातील बाटेवाडी, ता. पाटण गावावर डोंगराची कडा कोसळण्याची टांगती तलवार उभी असतानाच राहत्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली जगत आहे. गत 11 वर्षापासून वर्षानुवर्षे बाटेवाडी गावावर ही परिस्थिती ओढावत आहे. तरीही प्रशासन याकडे गांभिर्याने पाहत नाही. माळीण गावासारखी परिस्थिती ओढावण्याची वेळ प्रशासन बघत आहे की काय? असा प्रश्न ग्रामस्थ विचारु लागले आहेत.

चाफळच्या पश्चिमेस डोंगर कपारीत बाटेवाडी हे छोटसं गाव वसलेलं आहे. पाठवडे ग्रामपंचायती अंतर्गत या गावाचा समावेश होतो. 180 च्या आसपास लोकसंख्या असणार्‍या या गावात साधारणत: 26 कुटुंबे सध्या वास्तवास आहेत. येथील तरुण वर्ग नोकरी निमित्ताने मुंबई, पुणे येथे वास्तवास आहे. गावात वयोवृध्दासह महिला वर्ग रोजंदारी व शेती करुन आपले जीवन जगत आहेत.

 मूळातच स्वातंत्र्य पूर्व काळापासून या गावात मुलभूत सोईसुविधांचा वणवा पेटलेला आहे. गावात ये-जा करणारा रस्ता असो, अथवा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्ठीने उपाय योजना असो, अन्यथा पिण्याचे शुध्द पाणी असो या सर्व गोष्ठींसाठी येथील जनता सदैव झगडत आहे. याचे कोणाला कसलेच सोयर सुतक नाही. वारंवार व वर्षानुवर्षे मुलभूत सुविधांसह पुर्वसनासाठी झगडूनही येथील जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. यातच भरीस भर म्हणून की काय 2007 ला पावसाळ्यात अतिवृष्टी होवून डोंगराच्या कड्याचा काही भाग निसटून थेट गावाच्या दिशेने कोसळल्याने ग्रामस्थांची पळताभुई थोडी अशी अवस्था झाली होती.

यावेळी प्रशासकीय यंत्रणा पुर्वसनाच्या कामास लागली होती. परंतु या गोष्टीला तब्बल 11 वर्ष पूर्ण होत आली असतानाही याकडे कोणी गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. डोंगर दर्‍यातून वाहून येणारे पाणी थेट काही घरामध्ये घुसू लागले आहे. प्रशासनाकडे लक्ष द्यावे.


यापूर्वी घरावर दरड कोसळून येथील रामचंद्र दगडू जाधव व सिताराम तुकाराम जाधव यांच्या घराचे नुकसान झाले होते. या दरम्यान तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी गावास भेट देत गावचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यास ग्रामस्थांनीही होकार दर्शवला होता. पुर्नवसाचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. हे येथील वास्तव आहे.

…अन्यथा माळीणसारखी परिस्थिती उद्भवेल

चाफळसह परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. येथील ग्रामस्थ जुन्या आठवणींना उजाळा देत येथील जनता भितीच्या छायेखाली जगत आहे. यावर्षी डोंगराची दरड कोसळू देवू नये, एकंदरीत प्रशासन या गावाकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नसल्याने येथील जनतेने आपले सर्वस्व देवावर हवाली करत जीव मूठीत घेवून दिवस भितीच्या छायेखाली जगत आहेत. प्रशासनाने या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास माळीण सारखी परिस्थिती निर्माण होवू शकते.

वर्षभर पुनर्वसनाच्या बाबतीत दुर्लक्ष करणारा तालुक्याचा महसूल विभाग जून जूलैला न चुकता या गावातील आपत्तीग्रस्त कुटुंबांना योग्य ती काळजी घेण्याबाबत नोटिसा देत होता. परंतु यावर्षी नोटीस सोडा साधी विचारपूसही प्रशासनाने केली नाही. वर्षानुवर्ष मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनीधी पुनर्वसनाच्या बाबतीत कोणतीही ठोस उपाय योजना करताना दिसून येत नाहीत. यावर्षी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभा निवडणूक काळात काळ्या फिती लावून मतदानावर बहिष्कार घालणार आहे.
रामचंद्र जाधव,
ग्रामस्थ बाटेवाडी.