कराड विमानतळ विस्ताराचे काम सुरू करावे


कराड : कराड विमानतळाच्या विस्तारासाठी वारुंजी, मुंढे, केसे या गावातील 14 हेक्टर 25 आर क्षेत्र संपादीत करण्यात आले असून त्याचा कब्जा पूर्णपणे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांच्याकडे आहे. या भूसंपादनातील प्रकल्पग्रस्तांची देनी देऊन विमानतळ विस्ताराचे काम सुरु करावे, अशी मागणी आ. आनंदराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी केली आहे. 

याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी कराडला विमानतळाची निर्मिती केली. त्यानंतर 2012 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणास मंजुरी दिली. यासाठी वारुंजी, मुंढे, केसे येथील जमीन संपादीत करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 77 कोटी 94 लाख 76 हजार 252 रुपये एवढी रक्कम प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागणार आहे. यापैकी शासनाने उपविभागीय अधिकारी कराड यांच्याकडे 8 कोटी 75 लाख 51 हजार 520 रुपये एवढी तरतुद केली आहे.

विमानतळाच्या विस्तारवाढीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. मोठमोठे औद्योगिक प्रकल्प मार्गी लागतील. तसेच पाटण तालुक्यात कोयना धरण तर हजारमाची येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भुकंप संशोधन केंद्र आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला विमानतळ उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमहोदयांनाही सांगली, कोल्हापूर व सातारा जिह्यात येण्यासाठी कराड विमानतळाची निवड करावी लागते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना देय असणारी 69 कोटी 41 लाख 72 हजार 990 रुपयांची तरतुद अर्थसंकल्पीय अधिवेशन 2018च्या पुरवणी मागण्यात करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱयांना द्यावा, ही देणी देऊन विमानतळाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी आ. पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यानगर येथे आर्थिक दुर्बल घटकातील मुलींसाठी 200 क्षमतेचे वसतीगृह बांधण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर हे वसतीगृह तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करुन सुरु करण्यात येणे गरजेचे होते. मात्र ही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे वसतीगृह तातडीने सुरु करुन सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार आनंदराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे.

या कामासाठी 5 कोटी 83 लाख 92 हजार रुपये इतका खर्च आला आहे. तळमजल्यावर 12 खोल्या, वसतीगृह अधीक्षक निवासस्थान, पहिल्या मजल्यावर 21 खोल्या तर दुसऱया मजल्यावर 17 खोल्या आहेत. सदरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र इमारतीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे वसतीगृह तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करुन तातडीने सुरु करण्यात यावे. तसे झाल्यास चालु शैक्षणिक वर्षात मुलींच्या शिक्षणासाठी उपयोग होईल, असे आमदार आनंदराव पाटील यांनी सांगितले.

कोयना प्रकल्पग्रस्त तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या मुंढे सबस्टेशनसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनींच्या मालकांच्या घरातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्युत कंपनीकडे रोजंदारी तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

No comments

Powered by Blogger.