Your Own Digital Platform

चिमुकल्या बहिणींनी उवा मारण्याचे औषध खाल्ले; एकीचा मृत्यू


सातारा : खेळत असताना घरात असणारी उवा मारण्याची पावडर खाल्ल्याने अत्यवस्थ झालेल्या अंदोरी (ता.खंडाळा) येथील शानू अविनाश सपकाळ (वय 4 वर्षे) आणि आरती अविनाश सपकाळ (वय अडीच वर्षे) या दोघींना उपचारासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्देवाने मात्र यातील आरतीचा मृत्यू झाला असून, शानूची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे सपकाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, अंदोरी (ता.खंडाळा) येथे आरती व शानू या बहिणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात खेळत होत्या. खेळत असताना चुकून दोघींना उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी पावडरची पुडी सापडली. पुडी घेवून त्यातील असणारी पावडर त्यांनी खाल्ली. पावडर खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. खेळणार्‍या दोघी अचानक उलट्या करु लागल्याने कुटुंबिय घाबरुन गेले.

पालकांनी मुलींकडे चौकशी केली असता शानूने खेळताना सापडलेल्या पुडीमधील पावडर खाल्ल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तत्काळ या दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच आरतीची प्रकृती अत्यवस्थ बनली. यामुळे सपकाळ कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघींवर उपचार सुरु असताना मात्र आरतीचा मृत्यु झाला.

मुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी आक्रोश केला. या घटनेने सिव्हील रुग्णालयात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, शानूची प्रकृती स्थिर असून तीच्यावर उपचार सुरु आहेत. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्‍यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.