Your Own Digital Platform

सातारकरांची ब्रेक टेस्टसाठीची कराडवारी लवकरच थांबणार


सातारा : सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना पासिंगसाठी कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. यामुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांचा हा त्रास संपुष्टात येण्यासाठी तातडीने सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयासाठी नवीन टॅक उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. ना. रावते यांनी तातडीने याबाबत निर्णय घेवू असे आश्‍वासन दिल्याने सातारकरांची ब्रेक टेस्टसाठीची वारी आता लवकरच थांबणार आहे.

यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान ना. रावते यांची भेट घेतली. लेखी निवेदन देवून या समस्येसंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. वाहनांचे पासिंग करताना त्याची ब्रेक टेस्ट घ्यावी लागते. यापुर्वी सदर टेस्ट वर्ये येथे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर घेतली जात असे. दरम्यान, काही दिवसांपासून सदर ट्रॅकवर ब्रेक टेस्ट घेण्यास बंदी घातली गेली. याला पर्याय म्हणून कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहने पासिंगसाठी पाठवण्याचा निर्णय परिवहन कार्यालयाने घेतला. या निर्णयामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पासिंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना आता कराडला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवळ हेलपाटे मारुन भागत नाही तर, वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

तसेच कराडमधील वाहनांचे पासिंगही त्याठिकाणी होत असल्याने साताऱ्यातील वाहनधारकांना ताटकळत बसावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा येथील कार्यालयासाठी नवीन ट्रॅक उपलब्ध करुन देणे अत्यावश्‍यक आहे. याबाबत आपण तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. रावते यांच्याकडे केली.

याबाबत आपण यापूर्वीच परिवहन विभागाच्या सचिवांशीही चर्चा केली असून आपण स्वत: लक्ष घालून साताऱ्यातील वाहनधारकांची जटील समस्या तातडीने सोडवावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. रावते यांना सांगितले. ना. रावते यांनी मी स्वत: लक्ष घालून सातारा कार्यालयासाठी नवीन बेक्र टेस्ट ट्रॅक लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश संबंधीतांना देतो असे सांगून याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असे आश्‍वासन ना. रावते यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले. ना. रावते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पासिंगसाठी कराडला हेलपाटे मारणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. समस्या निर्माण झाल्यापासून सातारा कार्यालयासाठी नवीन ट्रॅक तयार करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे प्रयत्नशील आहेत. आज ना. रावते यांची भेट घेवून या समस्येचा निपटारा करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष प्रयत्न केले असून लवकरच ही समस्या संपुष्टात येणार आहे.