Your Own Digital Platform

ट्रान्सफॉर्मर सुरू केल्यास रास्ता रोको


गोंदवले : गोंदवले खुर्द येथील पोळ वस्तीवरील ट्रान्सफार्मर गेले अडीच महिने बंद असून नवीन ट्रान्सफार्मरसाठी पैसे भरुनही महावितरणाच्या दहिवडी व वडूज कार्यालयाकडून टोलवा-टोलवी सुरू आहे. यामुळे शेतकरी संतप्त झालेले असून सातारा-लातूर महामार्गावर रस्ता रोको करणार आहेत. याबाबतचे निवेदन दहिवडी पोलीस ठाणे व महावितरण कार्यालयाला देण्यात आले आहे.

गोंदवले खुर्द येथील नारायण पोळ यांच्या वस्तीवरील शेतकऱ्यांकसाठी एक ट्रान्सफार्मर असून तो गेले अडीच महिने बंद आहे. यामुळे पाण्याविना पिके वाळून गेली असून जनावरांना पिण्यासाठी पाण्याची अडचण झाली आहे. ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अनेक विहिरींना मुबलक पाणी आहे, मात्र पायऱ्या नसल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

ट्रान्सफार्मरवर विद्युत जोडणी असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन ट्रान्सफर्माला लागणारे 20 हजार रुपये दहिवडी कार्यालयात 2 जूनला भरण्यात आले. ट्रान्सफार्मर जोडण्यासाठी लागणाऱ्या फ्यूज वायर खरेदीसाठी लागणारे 6 हजार देखील गोंदवले कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे भरण्यात आले. यास सव्वा महिना होवून गेला. 

तरीही ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याबाबत टोलटोलवी सुरू होती. गोंदवलेचे शाखाधिकारी विचारणा करण्यास गेलेल्या नागरिकांना उद्धट उत्तरे देत आहेत. यामुळे संतप्त शेतकरी उद्या सातारा लातूर मार्गावर रास्ता रोको करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ट्रान्सफार्मर मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, सध्या पंढरपूरकडे अनेक दिंड्या चालल्या असून या रास्ता रोको मुळे जर काय अडचण निर्माण झाली तर त्याला वीज वितरण कार्यालय जबाबदार राहील.