बहर आला पर्यटनाला; तरूणाई निघाली भिजायला


सातारा : यंदाच्या समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कडयाकपारींचे रूपडे पालटू लागले आहे. हिरवाईने हा परिसर नटू लागला असून तरूणाईची पावले त्याकडे वळू लागली आहेत. कास, ठोसेघरसह, भांबवली, नवजा, ओझर्डे, लिंगमळा येथील धबधब्यांसह पाचगणी, महाबळेश्‍वरकडे जाणार्‍या मार्गावरील छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. या धबधब्यांमध्ये भिजण्यासाठी तरूणाई जणू सज्ज झाली आहे. या परिसरात तरूण-तरूणींची गर्दी होऊ लागली आहे.

सातारा जिल्ह्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणांकडे तरूणाईचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई पाठोपाठ आता ठोसेघर, कास, बामणोली, कोयनानगर, अजिंक्यतारा, मेणवली, विविध ठिकाणचे धबधबे पाहण्यासाठी व तेथे चिंब भिजण्यासाठी तरूणाई आतूर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने हा परिसर हिरवाईने नटू लागला आहे. या मार्गावरील डोंगर कपारीत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आता आकर्षित करू लागले आहेत. धुक्याची दुलई पांघरलेला हा परिसर तरूणांसाठी आल्हाददायक ठरू लागला असून दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची अनोखी मजा लुटण्यासाठी युवा वर्ग संधीची वाट पाहू लागला आहे.
गेल्या काही वर्षात ठोसेघर, कास या परिसरात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे या पर्यटनस्थळांना गालबोट लागले आहे. त्यांच्या विकासाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शासनाकडून या ठिकाणच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कास-बामणोली-ठोसेघर येथे पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

ठोसेघरला धबधब्याच्या दरीत कोसळून अनेकांचे जीव गमावल्यानंतर तेथे रेलिंग करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ठोसेेघर, कास परिसरात कुणाचा धाक नसल्याने हुल्लडबाजी करणार्‍या तरूणाईची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात वाढू लागलेल्या पर्यटनामुळे रोजगार निर्मितीत वाढ होऊन नवी इंडस्ट्री उभी राहू शकते. पर्यटनाच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आराखडा बनवला गेला तर अर्थकारणावरही चांगले परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यटनस्थळांवरील वातावरण निकोप रहावे, यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

विकास व सुरक्षेसाठी प्रयत्न आवश्यक

महाबळेश्‍वर, पाचगणी अशा जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश असलेल्या सातारा जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षात अजूनही नवी पर्यटनस्थळे उदयास येत आहेत. मात्र, हुल्लडबाजी, शिस्तीचा अभाव, सुरक्षितता आदी कारणांवरुन या पर्यटनस्थळांचा बदलौकीक होत आहे. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी, सुरक्षिततेसाठी शासनाकडून तातडीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

No comments

Powered by Blogger.