Your Own Digital Platform

‘स्वाभिमानी’ने अडविला दुधाचा टेम्पो


कराड : दूध दर आंदोलनाची तिव्रता दुसर्‍या दिवशीही कायम होती. तालुक्यातील सुमारे 34 हून अधिक गावात शेतकर्‍यांनी स्वत:हून संस्थांना दूध घातले नसल्याने दूध संकलन केंद्रे बंद होती. त्यामुळे या आंदोलनात स्वत: शेतकरी सहभागी झाल्याचे दिसून आले. कराडजवळ कृष्णा नाक्यावर कोयना दूध संघाचा टेम्पो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी अडविल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, महामार्गावरून जाणार्‍या दूध टँकरला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह योगेश झांबरे व राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घराळ यांचा समावेश असून त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्याने इतर कार्यकर्ते दिवसभर शांत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. दूधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरु असून यातून शेतकर्‍यांचाच फायदा होणार असल्याने शेतकरी स्वत:हून आंदोलनात सहभागी होत आहेत, ही चांगली बाब असल्याचे सचिन नलवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्यांनी अद्यापही आंदोलनात भाग घेतला नाही, त्यांनी संकलन केंद्रात दूध न घालता आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहनही नलवडे यांनी केले आहे.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशीही तालुक्यातील बहुतांशी दूध संघ बंद राहिले. तालुक्यातील पार्ले, केसे, वडोली निळेश्‍वर, बाबरमाची, राजमाची, कोपर्डे हवेली, करवडी, शामगाव, अंतवडी, रिसवड, मसूर तसेच कराड दक्षिणमधील वाठार, काले आदी मोठ्या गावात शेतकर्‍यांनी स्वत:हून दूध संस्थांना दूध घातले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दूध संकलन झाले नाही.

दरम्यान, सचिन नलवडे हे कार्यकर्त्यांसह कराडमध्ये येत असताना त्यांना कराड कृष्णानाक्यावर दूध वाहतूक करताना टेम्पो आढळून आला. त्यामुळे टेम्पो अडविला असता कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी सचिन नलवडेसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.