Your Own Digital Platform

भरारी पथकाचा वाळू तस्करांना दणका


पळशी : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने रविवारी रात्री दहिवडी व मायणी येथे छापा टाकून रात्रीत 5 अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.

माण-खटाव तालुक्‍यात वाळू तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यावर पायबंद घालण्यासाठी दोन महिन्यापूर्वी माण-खटाव तालुक्‍यांसाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी भरारी पथक तयार करून जवळपास 30 वाहने पकडली आहेत. रविवारी रात्री प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दहिवडी येथील तुपेवाडी परिसरात एक ट्रॅक्‍टर वाळुची अवैध उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली. 

त्यानुसार त्यांनी रात्री 11च्या सुमारास मेसी फॅग्युसन कंपनीचा एक ट्रॅक्‍टर पथकासोबत छापा टाकून पकडला. तसेच खटाव तालुक्‍यात मायणी येथील अभयारण्यात वाळु उत्खनन सुरू असल्याची खबर मिळताच रात्री 1 वाजता विनापरवाना वाळु उत्खनन व वाहतुक करताना पिक-अप (एमएच 10 एक्‍यू 0657) पिक-अप (एमएच 12 जेएफ 5256), एक विनानंबर अशोक लेलॅड कंपनीच पिक-अप, मायणी येथील संतोष ढवळे यांच्या मालकीचे पिक-अप अशी चार वाहने छापा टाकुन पकडली. या कारवाईत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तलाठी संतोष ढोले, गणेश बोबडे, रवी शिंदे, तुषार पोळ, महेश शिंदे, प्रशांत कोळी हे भरारी पथकातील कर्मचारी तर मायणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोसावी, कॉन्स्टेबल खाडे, दोलताडे हे या पथकासोबत कारवाईत सामील होते.