Your Own Digital Platform

मत्रेवाडी घाटात एसटीचा बे्क फेल


तळमावले : ‘वेळ आला होता, पण काळ नव्हता’ याची प्रचिती शुक्रवारी सकाळी मंत्रेवाडी घाटात ढेबेवाडी परिसरातील लोकांना आली. एसटीचा ब्रेक फेल झाल्यानंतर केवळ चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जवळपास 40 ते 45 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. कराड आगाराच्या एसटीबाबत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.माईंगडेवाडी (निगडे) - ढेबेवाडी (एमएच 14 - बीटी 0676) या क्रमांकाची एसटी निगडेहून ढेबेवाडीकडे निघाली होती. 

मत्रेवाडीचा घाट उतरत असताना सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे एसटीचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचा एसटीवरील ताबा सुटला. चालकाने प्रसंगावधान राखत एसटी डोंगराच्या दिशेने नेत एका बाजूला धडवकली. त्यामुळे एसटीचा वेग कमी होऊन एसटी थांबली. मात्र त्यावेळी एसटी मार्गालगतच्या तीव्र उताराच्या बाजूने झुकली होती. त्यामुळेच चालकाने प्रसंगावधान राखत एसटी थांबवली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता.

या एसटीतून ढेबेवाडी, तळमावले तसेच कराडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. शुक्रवारीही विद्याथ्यार्र्ंसह स्थानिक लोकांमुळे एसटीमधील प्रवाशांची संख्या 45 च्या घरात होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत दाखवल्या जाणार्‍या दुर्लक्षामुळे स्थानिक लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एसटी रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन अडकल्यानंतर ती बाहेर काढण्यासाठी युवकांसह स्थानिकांनी धाव घेतली होती. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती.

प्रत्येक एसटीची दुरूस्ती वेळच्यावेळी होणेही आवश्यक आहे, अन्यथा काय होऊ शकते? याची प्रचिती शुक्रवारी आली. काही दिवसांपूर्वी पाटण आगाराची एसटीही मरळीच्या घाटामध्ये ब्रेक फेल झाली होती. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.