Your Own Digital Platform

शासनाने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीबाबत गांभिर्याने विचार करावा


पाटण : दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत पाटणसह परिसरातील शेतकऱ्यांनी कराड-चिपळूण राज्य मार्गावर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झेंडा चौकात आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीबाबत गांभिर्याने विचार करावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी बोलताना दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठींबा दिला.

दरम्यान, आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जावून तहसीलदार रामहरी भोसले यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, असे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीसंदर्भातील आंदोलनाचे लोन पाटण तालुक्यात पोहोचले. तालुक्यातील सोनवडे, निसरेसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करून आंदोलन केले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलनात सहभाग घेतला. गुरूवार दि. 19 रोजी पाटणसह परिसरातील शेतकरी झेंडा चौकात जमा झाले होते. सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांनी दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत आंदोलन केले.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विकास हादवे व शेतकरी लक्ष्मण चव्हाण बोलताना म्हणाले, रात्रं-दिवस राबून, शेतात घाम गाळूनही शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतीपूरक दूध व्यवसाय केला तर त्या दुधाला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हे शासन शेतकऱ्यांचे हिताचे कोणतेच निर्णय घेत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. अन्यथा यापुढे तालुक्यातील शेतकरी एकजुटीने मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी बोलताना दिला.

तद्‌नंतर आंदोलकांनी घोषणा देत पायी चालत जावून तहसीलदार रामहरी भोसले यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी बाळासाहेब देसाई, अनिल भोसले, यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रांत कांबळे यांनी आभार मानले. या आंदोलनात प्रभाकर देसाई, अनिल पवार, राजेंद्र देशमुख, गणपती कुंभार, कृष्णत क्षीरसागर, संजय लोहार, आनंदा टोळे, सचिन भोसले, मच्छींद्र मगरे, दिलीप नायकवडी, राजेंद्र नायकवडी, नंदकुमार नलवडे, शिवाजी लुगडे, रामचंद्र गुरव, चंद्रकांत देसाई, महेंद्र चव्हाण, मनोज देसाई, सुर्यकांत गुरव, सागर गुरव, दत्तात्रय टोळे, मयुर सावंत, शंकर चौधरी, राहूल नायकवडी, संदेश चौधरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगध जाधवर व सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.