Your Own Digital Platform

नगरपरिषद शाळेच्या सभागृहाचे रूपडे पालटले


राड : नगरपरिषद शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत चालल्यामुळे पालकांचाही शाळांकडे ओढा वाढत असल्याचे दिसते. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, यांचे कष्ट प्रेरणादायी आहेतच पण त्यांना समाजातून मिळणारी दातृत्वाची साथ अनमोल अशीच आहे. कराड शहरातील उद्योजक संदीप पवार यांच्या दातृत्वामुळे येथील 9 नं. शाळेच्या सभागृहाचे रूपडेच पालटून गेले आहे. त्याला स्व. पी. डी. पाटील साहेब सभागृह असे नाव देण्यात आले असून गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते त्याचा शुभारंभही झाला.

शहरातील अनेक दातृत्वांनी केलेल्या मदतीमुळे सर्व सुविधांनीयुक्त अशी शाळा बनली आहे. रंगरंगोटी केलेल्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. त्याच पद्धतीने गणित व इंग्रजीचे स्वतंत्र कक्ष, मुलांना वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती व्हावी व त्यांनी वाचन करावे यासाठी सुसज्ज ग्रंथालय, प्रोजेक्टद्वारे डिजिटल क्लासरूम, मनोरंजक खेळणी, आकर्षक वर्गरचना, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच आदी सुविधा या लोकसहभागातूनच करण्यात आल्या आहेत. त्याला पालिकेचेही आर्थिक सहाय्य मिळाले आहे. परंतु जास्तीत जास्त मदत ही दानवीरांकडून मिळाली आहे.

मुख्याध्यापक अरविंद पाटील व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी शाळेचा चौफेर विकास व्हावा यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. शाळेत शिक्षकांची मंजूर पदे ही 17 असताना फक्त 7 महिला शिक्षिकांच्या मदतीने शाळेचे कामकाज सुरू आहे. शिक्षकांवर कामाचा बोजा वाढत असतानाही कोणतीही तक्रार न करता शाळेच्या विकाासासाठी अहोरात्र झटताना त्या दिसतात. या सर्वांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून शाळेत असणारी अवघी 250 विद्यार्थ्यांची संख्या आता 600 वर पोहोचली आहे.

शाळेत सर्व सुविधा झाल्या परंतु शाळांचे उपक्रम घेण्यासाठी असणारे शाळेचे सभागृह हे जुन्याच स्वरूपाचे होते. त्याचेही नुतनीकरण करावे अशी मुख्याध्यापक अरविंद पाटील यांची इच्छा होती. परंतु त्यासाठी त्यांना अपेक्षित मदत मिळत नव्हती. अद्ययावत सभागृहाची संकल्पना त्यांनी शहरातील उद्योजक संदीप पवार यांच्याकडे मांडली. पवार यांनी कसलाही विचार न करता नुतनीकरणासाठी मदत करण्याचे मान्य केले. या सभागृहासाठी एकूण 3 लाख रूपयांचा खर्च आला. त्यात रंगरंगोटी, आकर्षक पडदे, फॅन, पीओपी, फरशीवर कारपेट बसवण्यात आले आहे. एकूणच या सभागृहाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले असून त्याचे रूपडे पालटले आहे.

 या अद्ययावत सभागृहाला. स्व. पी. डी. पाटील साहेब यांचे नाव देण्यात आले आहे. गुरूवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेविका अरूणा पाटील, गजेंद्र कांबळे, उद्येाजक संदीप पवार, शिक्षक व पालक उपस्थित होते.