निवासस्थानाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी


सणबूर : ढेबेवाडी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामाला वापरले जाणारे साहित्य हलक्या दर्जाच आहे. त्यामुळेच प्रशासनाने यात लक्ष घालत चौकशी करणे आवश्यक आहे.दुर्गम समजल्या जाणार्‍या ढेबेवाडी विभागातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन आ. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून ढेबेवाडी येथे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयात लोकांना चोवीस तास सेवा मिळावी, यासाठी डॉक्टरांसह आवश्यक वैद्यकीय कर्मचारीही उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनेक कर्मचारी बाहेर गावचे असल्याने त्यांना राहण्यासाठी निवासस्थानांची आवश्यकता आहे. त्यामुळेच निवासस्थानांसाठी 2 कोटी 12 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून निवासस्थानांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र प्रथमपासून हे काम सतत चर्चेत आहे. बांधकामासाठी समुद्राची वाळू वापरली जात आहे. त्यामुळे वापरले जाणारे स्टील गंजणार असल्याचा दावा करत उपअभियंता व्ही. एल. खाडे यांच्याकडे तोंडी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी ही वाळू बांधकामास वापरू नये, असे सांगितले होते. त्यानंतरही समुद्रातील वाळूचा वापर करत इमारतीचा पाया करण्यात आला आहे.

त्याचबरोबर तयार साहित्याचा वापर करत बांधकाम करण्यात आले आहे. याबाबतही लोकांचा आक्षेप आहे. बांधकामासाठी वापरली जाणारी सिमेंटची वीट निकृष्ट असून त्याचा वापर करू नये, अशी मागणी केल्यानंतर शाखा अभियंता राजाराम खंडागळे यांनी प्रत्यक्ष या बांधकामाला भेट दिली होती. त्यानंतर या विटा बदलण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळेच आता संपूर्ण कामाचा दर्जा तपासण्याची मागणी होत असून लोकांमधून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

No comments

Powered by Blogger.