माहुलीचा कृष्णापूल ‘डेथलाईन’च्या वाटेवर


खेड : सातारा -कोरेगाव मार्गावरील माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाने नकुतीच 103 वर्षे पूर्ण केली. हा ब्रिटीश कालीन पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत तोकडा पडत असून सातत्याने होणारे अपघात व कमकुवत होत चाललेल्या बांधकामामुळे हा पूल ‘ डेथलाईन’च्या वाटेवर आहे. 

त्यामुळे या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली पुलाची 28 जून 1915 मध्ये उभारणी करण्यात आली. नुकतीच या पुलाला 103 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे हा पूल वाहतूकीस धोकादायक असून या पुलाचे आयुष्यमान संपले असल्याचे पत्र ब्रिटीशांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला आले असल्याचे समजते. याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे पुलावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पुलाचे संरक्षक कठडे ठिसूळ झाल्यामुळे हे कठडे केव्हाही कोसळू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धोकादायक पुलांच्या यादीत माहुली पुलाचा समावेश असून सातारा-पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणात नवीन पुलाचे काम प्रस्तावित असल्याचे बोलले जात आहे. 

अद्यापही यावर कोणतीच कार्यवाही नसल्याने परिसरातील गावांमधून बांधकाम विभाग व रस्ते विकास प्राधिकरणाला पत्रे देण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींनीही याकडे कधी गांभीर्याने न पाहिल्याने पुलाबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे.

No comments

Powered by Blogger.