प्रशासकीय नोकरी ठरतेय राजकीय शिक्षा


पाटण : पाटण तालुक्यात प्रशासकीय अनेक पदे रिक्त आहेत. येथे येण्याची अधिकारी, कर्मचारी यांची मानसिकता नसते. यापूर्वी भूकंप, अतिवृष्टी, डोंगराळ व मागासलेला तालुका म्हणून भीती होती. गेल्या काही वर्षात येथील राजकीय स्पर्धा व राजकीय सत्ता विकेंद्रीकरणातून होणारा हस्तक्षेप यामुळे पाटणची नियुक्‍ती ही सक्तीची किंवा शिक्षेची असे अनुभवायला मिळते. या साठमारीत बळी हा सामान्य जनतेचाच जातो याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. पाटण तालुक्यातील बहुतांशी शासकीय कार्यालयात सध्या अनेक महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढच चालले आहे. 

सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणार्‍या तलाठी, ग्रामसेवकापासून वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, सेविका, मदतनीस यांची पदे रिक्त आहेत. कोयना प्रकल्पात तर रिक्त जागांचा विक्रमच मोडीत निघालेला आहे. निश्‍चितच ही दयनिय अवस्था नक्की कशामुळे होतेय याचा विचार होणे गरजेचे आहे.

पूर्वी पाटण तालुक्यात बदली म्हणजे भूकंप, अतिवृष्टी, महापूर व भौगोलिकदृष्ट्या मागासलेला यामुळे येथे येण्यास अधिकारी, कर्मचारी तयार नव्हते. अलीकडच्या काळात भौगोलिक परिस्थिती बदलली गेली. गेल्या काही वर्षांत आमदारकीची व पंचायत समितीची सत्ता ही संगीत खुर्ची प्रमाणे आ. शंभुराज देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाकडे फिरत राहिली आहे. 

त्यामुळे येथे राजकीय संवेदनशीलता व स्पर्धेपेक्षाही इर्षेचे राजकारण तसेच प्रशासकीय कामात नको इतका हस्तक्षेप याचाही दुष्परिणाम या व्यवस्थांवर झाल्याचे अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवत आहेत. येथे विकासात्मक दृष्टीकोन न ठेवता एकमेकांवर डोळा ठेवून कामांची पद्धत राबविली गेल्याने एका गटाने सुचविलेले काम दुसर्‍याने हाणून पाडायचे हिच परंपरा जपली गेेली. त्यामुळे स्थानिकांचा तर तोटा होतोच शिवाय अधिकार्‍यांची मानसिकताही नकारात्मक होते. परिणामी केवळ पाट्या टाकणे यातच तेही धन्यता मानतात. रिक्त पदांचा सामान्यांसह सार्वजनिक विकासावरही दूरगामी परिणाम होत असताना त्याचा गांभीर्याने विचार होत नाही हे दुर्दैवच.

No comments

Powered by Blogger.