Your Own Digital Platform

लोककल्याणकारी योजनांची ‘संवाद’वारी नक्कीच फायदेशीर ठरेल: संतोष जाधव
स्थैर्य, फलटण : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर संवाद वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये छायाचित्र प्रदर्शन, पथनाट्य, चित्ररथ, कलापथक, तसेच एल. ई. डी व्हॅन च्या माध्यमातून शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती वारीच्या वाटेवर वारकर्‍यांना दिली जात आहे. वारकर्‍यांचा देखील या उपक्रमास भरघोस प्रतिसाद लाभत आहे. 
 
आज फलटण येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचा मुक्काम आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी संवाद वारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन आज उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय पाटील, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या संस्कृतीच बीज हाती धरणारी संवाद वारी नक्कीच फायदेशीर ठरेल. संवाद वारी या उपक्रमातून थेट संवाद साधण्याचं काम होत आहे, अशी भावना उपविभागीय श्री. जाधव यांनी व्यक्त केली.

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजना कल्पकरित्या या निमित्ताने वारकर्‍यांपर्यंत पोहचत आहेत. प्रशासनात राहून नेहमी विविध पातळीवर योजना पोहचविण्याचा प्रयत्न अधिकारी करत असतात पण या उपक्रमातून व्यापकरित्या त्या या संवादवारी उपक्रमातून पोहचतील. योजनांची माहिती होण्याबरोबरच कलपथक तसेच पथनाट्य या सारखे उपक्रम वारकर्‍यांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे योजनांची योग्य अमलबजावणी होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल, असे मत यावेळी तहसीलदार श्री. पाटील यांनी व्यक्त केले. मुख्याधिकारी श्री. कदम यांनी देखील या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माहित सहाय्यक राहुल पवार, वैभव जाधव यांनी विशेष प्रयत्न घेतले. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, व्यंकटेश देशपांडे, सुभाष भांबुरे, यशवंत खलाटे, अ‍ॅड.रोहित अहिवळे, स.रा. मोहिते, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, प्रदीप चव्हाण, दिपक मदने, बाळकृष्ण सातव, ‘अनुलोम’ चे समीर पवार यांच्यासह फलटण येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.