निसर्गसौंदर्याने महाबळेश्‍वर-पाचगणी बहरली!


भिलार : निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करुन पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम दृष्य महाबळेश्‍वर-पाचगणी परिसरात पहावयास मिळत असून ऐन पावसातही अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्‍वर-पाचगणी परिसरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. येथील पावसाचे न्यारे रूप पहावयास मिळत आहे.

जून महिना सुरु झाला की पाऊस सुरु होतो आणि येथील निसर्ग बहरु लागतो. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून येथील डोंगररांगा पडणार्‍या पावसामुळे आता हिरवळू लागल्या आहेत. सर्व परिसरात हिरवा गालिचा पसरु लागला आहे. येथील वाराही सुसाट वेगाने मदमस्त बेधुंदपणे वाहू लागला आहे. मध्येच केव्हातरी डोंगरपर्वतांवर धुक्याची शाल पांघरली जाते अन् निसर्ग सौंदर्याला बहार येते. पाचगणी, महाबळेश्‍वर परिसर तरुणांबरोबरच निसर्गप्रेमींना खुणावत आहे.

खास पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नवविवाहित, तरुण मुले, निसर्गप्रेमी पाचगणी-महाबळेश्‍वर येथे येत आहेत. पाचगणी परिसरातील सिडने पॉईंट, टेबल लॅन्ड आणि पारसी पॉईंटवरुन निसर्गाच्या जादुई कुंचल्याची किमया टिपताना धोम धरणाचे विहंमग रुप पाहण्याची मजा काही औरच असते.

पाचगणी-महाबळेश्‍वरमधला पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तसेच येथील भन्नाट रानवारा आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दुचाकी तसेच चार चाकीमधून फिरायला येणार्‍यांची संख्या वाढली असून पावसाच्या आनंदाबरोबरच भाजलेली कणसे, चने, शेंगदाणे खाण्याचा आनंदही पर्यटक लुटताना दिसत आहे.

पाचगणी-महाबळेश्‍वर म्हणजे निसर्गाला पडलेली दोन गोड स्वप्ने. इथला हिरवा गंध निसर्ग पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक याठिकाणी येत असतात. येथील भन्नाट रानवारा या पर्यटकांना निसर्गसौंदर्याचे वेड लावत आहे.

संततधार पाऊस व दरड कोसळल्याचे प्रकार महाबळेश्‍वर-पाचगणी परिसराला काही नवीन नाहीत. आताही त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. महाबळेश्‍वरला जाणार्‍या केळघर घाटातील वरोशी गावच्या वळणावर असणार्‍या संरक्षण भिंतीला मधोमध भगदाड पडले आहे. काही भाग दरीत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सातारा-महाबळेश्‍वर (मेढा मार्ग) हा सतत रहदारीचा मार्ग आहे.पावसाला सुरूवात झाली असून घाटात रस्त्याच्या बाजूने डोंगरी नाले नसल्याने दगड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे. रविवारी सकाळी वरोशी जवळ रस्त्याच्या खालील बाजूच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड पडल्याने रस्ता खचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

No comments

Powered by Blogger.