एक तरी वारी अनुभवावीजाता पंढरीसी सुख वाटे जीवा/
आनंदे केशवा भेटताची //
या सुखाची उपमा नाही /
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे //पंढरीची वारी कशासाठी करायची ? असा प्रश्न वारीला न गेलेल्या किंवा वारीला जाण्याच इच्छुक नसलेल्या अनेकांना पडत राहतो. वारीत काय आहे? काय मिळणार आहे वारी करून? नुसतं चालणं म्हणजे वारी का? वारी करणं म्हणजे काम नसणाऱ्यांचे काम. म्हातारपणी वारी करायची असते, वारीत सगळी घाणंच असते. कसं करायचं सगळं ॲडजस्ट? मला एवढ्या गर्दीत जायला आवडत नाही. वारी करून कुठं विठ्ठल भेटतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होणाऱ्या नास्तिक, आस्तिक, फुल टाईम- पार्ट टाईम भक्त-अभक्तांसाठी एकदा येऊन पहाच. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले आहे. पंढरीची वारी करून वर्षभरासाठी टॉनिक घेऊन आलेला वारकरी मात्र एक तरी वारी करावी, अनुभवावी असेच म्हणतो. वारीत जे मिळतं. ते कुठेच मिळत नाही. वारीत देव तरी भेटतोच शिवाय देवासारखी माणसंही भेटतात. माणसानं माणसाशी कसं वागायचं? हे ही शिकायला मिळतं.

वारकरी संप्रदायाचे कार्य शतकानुशतके कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता चालले आहे, कारण हा संप्रदाय गावागावात खोलवर रूजला आहे. अंधश्रद्धेला कसलाही थारा नसलेल्या या संप्रदायाच्या अनेक परंपरा, चालीरिती आहेत. ज्ञानेश्वर महाराज , नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराजांनी या संप्रदायासाठी फार मोठे योगदान दिले आहे. आषाढी, कार्तिक, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून जो नियमाने पंढरपुरास जातो. तो पंढरपूरचा वारकरी आणि त्यांच्या उपासनेचा मार्ग म्हणजे वारकरी पंथ. वारी केल्यास अनेक लाभ पदरी पडतात, निष्ठा बळकट होते. अंतरीचा प्रेमा वर्धिष्णू होतो. संत सज्जनाच्या भेटी होतात. वारी हे देव आणि भक्ताचे उच्च पातळीवरील स्नेहसंमेलनच असते. ज्ञानेश्वर महाराज हे खरे तर श्रेष्ठ योगी आणि ज्ञानी, परंतू ज्ञान आणि योग विसरून ते वारीच्या भक्तीप्रेमरसात तन्मय झाले. एकनाथ ममहाराजांनी वारीस साधनाचे सार म्हटले आहे.

साधन ते सार पंढरीची वारी
आन तू करी सायासाचे


पालखी सोहळ्यात सहभागी होऊन केली जाणारी वारी हे पृथ्वीवरील सर्वात मोठे सुख आहे. गेल्या काही वर्षात ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी आणि दिंड्याची संख्या फार वाढली आहे. पण पालखीबरोबर येणारा हा समुदाय फक्त जमा झालेल्या गर्दीच्या स्वरूपाचा नसून तो एकाच भावनावलयाने गुंफलेला सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध समाज असतो. वर वर पाहिले तर भिन्न प्रकारचे, स्वभावाचे,बुद्धीचे वा वर्गाचे स्रीपुरूष दिसतील, मात्र या सर्वामधून प्रेम भक्तीची एकच भावना असल्याने अनेकत्वात एकत्वाचा चिवट धागा असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे वारीतील वातावरण. पंधरा दिवसाच्या या काळात वारकरी निराळ्या सृष्टीत प्रवेश करतो. एक निराळाच आनंद अनुभवतो. घर, दार, संसार, काम, शेती, नोकरी या दैनंदिन जीवनातील क्षुद्र कल्पना दूर राहतात. आळंदी ते पंढरपूर हा एखादा प्रवास, खूप मार्ग न राहता भक्ती प्रेम सागरच बनून जातो. या प्रेमस्मृतीत दिवस केव्हा गेला, रात्र कधी आली याचे भान रहात नाही.
रात्री न कळे दिवस न कळे
अंगी खेळे दैवत हे

एक एक दिवस येतो जातो, वाटेत गावे येतात, जातात. पंढरी आणखी जवळ आली आहे. याचे समाधान सर्व थकवा दूर घालवते. सर्वाच्या शारीरिक व मानसिक अवस्था भिन्न असल्या तरी सर्वांच्या हदयाच्या गाभाऱ्यात माऊलीच्या प्रेमाची ज्योत तेवत असते, सर्वांच्या हृदयात आपणाबरोबर माऊली आहेत. तिचा हात धरून आपण चालत आहोत. ही गोड भावना असते. त्यामुळे वाचालीचा क्षीण रहात नाही. वाटच पायाखालून चालते, माणुस नव्हे. ऊन, वारा, पाऊस हा एक खेळच असतो, त्यात देहदंडनाची, तपश्चर्येची रूक्ष भावना नसते. निर्मळ चित्ते झाली नवनिते, पाषाणा पाझर फुटती रे असा अनुभव येतो. चित्ता काळजीने ग्रासलेले मन या वातावरणात आल्यावर त्याला संजीवनी येते. या प्रसन्नतेने तो आपोआप नाचू लागतो वारीत सहभागी होऊन मिळणारे सुख, लुटलेला आनंद शब्दात व्यक्त करता येण्याऐवढा छोटा नाही. या, सहभागी व्हा आणि पहा, असेच जणू सारे वारकरी सांगू इच्छितात. पंढरीचीवारी इतर सर्व तिर्थयात्रेहून अधिक श्रेष्ठ आहे. वाराणसीत मेल्यावर मोक्ष, गयेला पितृऋणाचा नाश मात्र पंढरीत रोकडा लाभ होतो असे संत तुकाराम महाराज म्हणतात.

मरण मुक्ती वाराणसी /
पितृऋण गया नाही //
उधार नाही पंढरीशी/
पायापाशी विठोबाच्या //


पंढरीची वारी मी अनेक वर्षापासून करत आहे. मला काही तरी मिळावे म्हणून मी वारीला येत नाही. वारीला येणाऱ्या माणसाला काही मागावे लागत नाही. येथे मिळणारे सुख जगातील सर्वात मोठे असे सुख आहे. वारी ही परमात्म्याला भेटण्याचा सहज आणि सोपा मार्ग आहे असं यशवंत माने (वय ६५) गुरूजी सांगतात.

No comments

Powered by Blogger.