Your Own Digital Platform

कास तलावाचे ओटीभरण


सातारा : कास पठरावरावरील दाट धुके, मंद वारा आणि सतत कोसळणार्‍या पावसाच्या धारा अशा अल्हाददायक वातावरणात श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) कास तलावाचा ओटीभरण कार्यक्रम सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पाडला. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी तलावाची खणानारळाने ओटी भरली.सातारकरांची वर्षभर तहान भागवणारा कास तलाव या महिन्याच्या सुरुवातीलाच भरला. वर्षाअखेरीस पाणीसाठा तळ गाठतो. 

त्यामुळे या तलावाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कास तलाव सध्या ओसंडून वाहत आहे. सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने घेण्यात आलेला कास तलावाच्या ओटीभरणाचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी तलावाची ओटी भरली. सभागृह नेत्या सौ.स्मिता घोडके, नियोजन सभापती स्नेहा नलवडे यांनी पाण्याचे पूजन केले. पठारावरील थंडगार वारा आणि पावसाच्या कोसळणार्‍या धारा झेलत मन प्रफुल्‍लित करणार्‍या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, समाजकल्याण सभापती संगीता आवळे, नगरसेवक राजू भोसले आदि उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात साविआतील दिग्गजांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्यासह बरेचजण या कार्यक्रमास गैरहजर राहिले, प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित नसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होती.