Your Own Digital Platform

भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनला द्या : पोलीस अधीक्षक संदीप पाटील


स्थैर्य, सातारा: सातारा जिल्ह्यातील हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घरमालकांनी त्यांनी ठेवलेल्या भाडेकरुंची नोंदणी संबंधित पोलीस स्टेशनला करणे व घर भाडेकरुचे रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. घरमालकांनी घर भाडेकरूंच्या माहितीचा विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधीत पोलीस ठाण्यातून प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

घरमालकांना आपले घर भाड्याने देत असताना भाडेकरूंकडून फोटो ओळखपत्र व मुळ पत्त्याचा रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय घर भाड्याने देवू नये. घर मालकांनी भाडेकरूंची स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूंची माहिती फॉर्ममध्ये संबंधीत पोलीस स्टेशनला बिनचुक द्यावी.

घरमालकांनी भाडेकरूंचे नोंदणी संबंधीत पोलीस स्टेशनला करणे व घरमालकांनी घर भाडेकरूचे रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. जेणेकरून स्वत:ची माहिती लपवुन राहणाऱ्या भाडेकरूंवर भविष्यातील समाज विघातक कृती होण्यापासून आळा घालणे आवश्यक आहे, याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून आपल्या पोलीस ठाणे हद्दीत भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुंची माहिती घरमालकांनी पोलीस ठाण्यास देणे गरजेचे आहे. 

ज्या घरमालकांनी आपले घर भाड्याने दिले असल्यास त्यात राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास दिली नाही अशा घरमालकांवर या आदेशान्वये कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरी ज्या घरमालकांनी अद्यापपर्यंत आपलेकडील भाडेकरूंची माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यास दिली नसेल त्यांनी तात्काळ माहिती पोलीस ठाण्यात विहीत नमुन्यात भरून सादर करावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.