यंदा लवकर कासवरील फुलांचा हंगाम बहरणार


सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बहरण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. जूनमधील समाधानकारक पावसामुळे आताच पठारावर रंग बिरंगी फुलांचे गालिचे निर्माण होऊ लागले आहेत. जुलैमध्ये अपेक्षित पाऊस झाला, तर शेवटच्या आठवड्यात पठार बहरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्या कास पठारावर पांचगणी आम्री, पिवळे भुईचक्र, गुलाबी भुईचक्र, रानहळद पांढरी, कापरू, रानवांगं, सातारान्सिस (वाई तुरा), बबळ्या ऑर्किड, पांढरा सापकांदा, अशी 5 ते 6 प्रकारची फुले दिसू लागली आहेत.त्यामुळे पठारावर पांढर्‍या रंगाच्या छटा पाहावयास मिळत आहे. कास पठारावरील फुलांचा हंगाम दरवर्षी साधारणत: ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बहरत असतो. गतवर्षीही सप्टेंबरपासूनच कासवरील पर्यटन शुल्क वसुलीला प्रारंभ झाला होता.

 यंदा मात्र अनुकूल वातावरणामुळे कासचा हंगाम लवकर बहरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पठारावर ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यातच हवामान फुलांसाठी पोषक असल्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कासवर विविध फुलांचा गालिचा सजण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षापेक्षा यंदा 15 दिवस अगोदर म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कास पठारावर वायुतुरा उमलला असल्याने यंदा फुलांचा हंगाम लवकर येण्याची अपेक्षा आहे. सातारा वायुतुरा हे फुल जूनच्या शेवटच्या आठवड्यात उमलत असते. यंदा मात्र ते लवकरच फुलले आहे.

यवतेश्‍वरपासूनच ठिकठिकाणी पांढर्‍या फुलांचे म्हणजेच पाचगणी आमरीचे गालिचे दिसू लागले आहेत. त्यामुळे माळरानावर बहरलेल्या रानफुलांच्या ताटव्यांची मनोहारी दृश्ये पर्यंटकांना आत्तापासूनच आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळे फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर येणार असून जिल्ह्यासह देश विदेशातील पर्यंटकांची पावले यंदा लवकर कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत. कास पठारावर पांढरा सांपकाद्यांने नागाच्या फण्यासारखे डोके काढले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर पठारावर पांढरे हबे आमरीचे कोंब कुठे कुठे उगवू लागले आहेत.

No comments

Powered by Blogger.