Your Own Digital Platform

चेतना सिन्हा यांचा पुण्यात सन्मान


म्हसवड : येथील माणदेशी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांना नुकतेच पुणे येथे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. खासदार सौ. वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, जेष्ठ समाजसेविका सौ. रेणु गावस्कर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, माण देशी फौंडेशनच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी वनिता शिंदे, जयश्री जाधव, अनिता साळवी, आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

सौ. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, समाजात महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्त्रियादेखील असल्याचे चित्र आशादायी आहे. सुरुवातीला चूल आणि मुल याकडे पाहणारी महिला, त्यानंतर स्त्री शिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे, स्त्री सबलीकरणासाठी शासनाची पावले आणि आज देशातील महत्चाच्या निर्णयामध्ये स्त्रीचा सहभाग आशादायी आहे.

चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशात काम करताना दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जनावरांसाठी छावणी सुरु केली. सामान्य महिलांना बचत करता यावी यासाठी माणदेशी बॅंकेची स्थापना केली. तसेच सांस्कृतिक वसा जपण्यासाठी माण देशी तरंगवाहिनी सुरु केली. केराबाई सरगर ज्या माणदेशी रेडीओवर कार्यक्रम करतात त्यांच्या गाण्याच्या प्रवास कसा सुरु झाला त्याबद्दल श्रीमती चेतना सिन्हा यांनी सांगितले. केराबाईनी पण स्टेजवर येऊन आपल्या गाण्याची एक झलक पुणेकरांना सादर करून दाखवली. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोसाहन मिळावे यासाठी माणदेशीने क्रीडा संकुल सुरु केले आहे. या सर्वांचा संदर्भ देत चेतना सिन्हा यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गायकवाड, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू तेजश्री नाईक यांना देखील पुरस्कार प्राप्त झाले. लीला ताई गांधी जेष्ठ अभिनेत्री, नाटय, कला, सांगितिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युच्च योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.