Your Own Digital Platform

आमदार पृथ्वीराज, सुशीलकुमारांची पत घसरली


सातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील वजनदार नेते म्हणून ख्याती असलेले आ. पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांची पक्षातील पत घसरल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच नव्या दमाची टीम जाहीर केली असून त्यामधून या दोघांचीही गच्छंती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून आता काँग्रेससाठी नवे कारभारी सक्षम करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दीर्घ प्रतीक्षेनंतर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली. 

पक्षाचे धोरण ठरवणार्‍या 51 जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत अनुभवी चेहर्‍यांसोबत नव्या दमाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना स्थान मिळालेले नाही. काँग्रेस कार्यकारिणीत 23 सदस्य, 18 कायम निमंत्रित सदस्य व इंटक, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि महिला काँग्रेसचे अध्यक्ष तसेच सेवादलाच्या मुख्य संयोजकांसह 10 विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळालेली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी पक्षात व राज्य तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. महाराष्ट्र म्हटले की काँग्रेसकडून या दोन्ही वजनदार नेत्यांची आजपर्यंत नावे पुढे येत होती. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांचा बोलबाला असायचा. मात्र, राहुल गांधींनी जाहीर केलेल्या नव्या टीममधून या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे पक्षातील त्यांची पत घसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्रातील सत्ता बदलाला मोदी लाटेबरोबरच अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरले जात आहे. त्यांच्यावर खुद्द पक्षातूनही तशीच टिका होत होती. मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून पक्षाला नवसंजीवनी देण्यात पृथ्वीराज चव्हाण अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर वारंवार ठेवला गेला. सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आ. पृथ्वीराज यांच्याबाबत कडवा विरोध दर्शवला होता. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सुशिलकुमार शिंदे यांचा जनाधार घसरला असल्याची टिकाही वारंवार झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना बाहेर रहावे लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून आता काँग्रेस सक्षम व सर्वसमावेशक नव्या नेतृत्वाचा शोध घेत असल्याचेही संकेत प्राप्‍त झाले आहेत.