सातारा पालिकेचे पार्किंग विकले होऽऽ


सातारा : सातारा शहरातील खुले भूखंड हे उत्पन्नाचे साधन असून त्याचे लिलाव न काढल्याने नगरपालिकेचे उत्पन्न बुडत असल्याचा शोध दहा वर्षांनी कारभार्‍यांना लागला. पण, नगरपालिका इमारतींच्या पार्किंगमध्ये ‘घरोबा’ करून बसलेल्या नागोबांचं काय? पालिकेने त्यांना पार्किंग विकले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. राजवाड्यासमोरील व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये एकाने हॉटेल थाटले आहे. तर, त्याच परिसरात जुन्या भाजी मंडईतील शॉपिंग सेंटर मटका बुकींचे मुख्य ‘कलेक्शन सेंटर’ बनले आहे. 

पालिका मिळकतींच्या आश्रयानेच बेकायदेशीर धंदे फोफावू लागल्याने सातारकरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सातारा नगरपालिकेचे शहरात 496 भूखंड आहेत.भाड्याने दिलेले हे भूखंड ताब्यात घेवून वाढीव दराने त्याचे फेरलिलाव काढण्याचा निर्णय पालिका कारभार्‍यांनी नुकताच घेतला. या भूखंडावर बर्‍याच ठिकाणी अतिक्रमणे तसेच बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. नगरपालिकेने दिलेल्या गाळ्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. एकेकाने दोन-दोन पोटभाडेकरु ठेवले आहेत. नगरपालिकेसोबत केलेल्या कराराचे त्यांच्याकडून उल्लंघन झाले आहे. मात्र, या सर्व बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असताना शॉपिंग सेंटर्सच्या पार्किंगकडेही डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या मिळकतींची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

सातारा नगरपालिकेने दहा वर्षांपूर्वी राजवाड्यासमोर शॉपिंग सेंटर बांधले. या शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु आहे. एका दुकानदाराने बेकायदेशीरपणे लोखंडी जीना त्यामध्ये बांधला. नगरपालिकेखाली असलेल्या दुकानांमध्येही बर्‍याच दुकानदारांनी बेकायदेशीरपणे बदल केले आहेत. तक्रारी होवूनही शहर नियोजन किंवा स्थावर जिंदगी विभाग कारवाई करत नाही. त्यामुळे राजवाड्यासमोरील शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यात पार्किंगच्या जागेत एकाने रेटून हॉटेलच सुरु केले आहे. या पार्किंगमध्ये गणेशोत्सव काळात स्टॉल्ससुध्दा उभारले जातात. त्यावरुन सभागृह डोक्यावर घेतले गेले होते. मग आता सुरु करण्यात आलेल्या हॉटेलवर मेहरबानी का? आर्थिक हितसंबंध असल्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.

पार्किंगचा बेकायदेशीर वापर का दिसत नाही? राजवाडा परिसरात पार्किंगची मोठी समस्या असताना काहीजण पार्किंग बळकावत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे राजवाडा शॉपिंग सेंटरमधील पार्किंगमध्ये असलेले अतिक्रमण काढून नागरिकांना पार्किंगची जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 
 
या शॉपिंग सेंटरपासून थोड्या अंतरावर जुन्या भाजी मंडईमध्ये सदाशिव पेठेत नगरपालिकेचे दुसरे शॉपिंग सेंटर आहे. त्याठिकाणच्या तळमजल्यामध्ये तर राजरोजसपणे मटका खेळला जातो. मटका लावणारे आणि घेणार्‍यांची मोठी गर्दी याठिकाणी असते. या ठिकाणी मटका मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. नगरपालिकेचे ते शॉपिंग सेंटर राहिले नसून मटका बुकींसाठी ते मध्यवर्ती ‘कलेक्शन सेंटर’ झाले आहे. नगरपालिकांच्या मिळकतींमध्ये राजरोसपणे बेकायदेशीर धंदे चालत असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ असे म्हणायची वेळ आली आहे.

नगरपालिकेच्या संबंधित विभागांचे याकडे लक्ष नाही. कमानी हौद चौकातील शॉपिंग सेंटर्सचे पार्किंग म्हणजे उनाड मुलांच्या बैठकीचा अड्डा बनले आहे. सिगारेट-विड्या ओढत बरेचजण या पार्किंगमध्ये गर्दी करताना दिसतात. काही आजी-माजी नगरसेवक तर समोरच्या टपरीवर चहा घेतात. पण, महिला-मुलींना त्रास देणार्‍या त्या टवाळखोरांना हटकत नाहीत. या शॉपिंग सेंटर पार्किंगचा स्वच्छतागृह म्हणून वापर केला जात आहे. जुन्या इमारतींची व्यवस्था होत नसताना आणि आवश्यकता नसताना नव्या इमारती बांधण्याचा घाट कशासाठी घातला जातो? असा सवाल केला जात आहे.

No comments

Powered by Blogger.