प्लॅस्टीक बंदी व वृक्षारोपण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे : सचिन गुदगे


मायणी : महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण राज्यात पन्नास कोटी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच प्लास्टिक बंदीचा देखील काही अपवाद वगळता निर्णय घेण्यात आला आहे .या संदर्भात मायणी ग्रामपंचायती मार्फत प्लॅस्टिक बंदी व वृक्षारोपण हे सामाजिक कार्यक्रम राबविले जातील .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन मायणीचे सरपंच सचिन गुदगे यांनी केले .

मायणी ग्रामपंचायत ,सामाजिक वनीकरण विभाग, स्फूर्ती शिक्षण मंडळ, अनंत इंग्लिश स्कूल व भगतसिंह हायस्कूल, जि .प. शाळा मुले व मुली आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .वृक्ष दिंडीच्या चांदणी चौकात समारोप समारंभप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते .सदर वेळी मायणी ग्रा.पं.चे उपसरपंच अॅड . सूरज पाटील ,डॉ. उर्मिला येळगांवकर, भाजपचे मायणी शहर अध्यक्ष जालिंदर शेठ माळी, पोलीस पाटील प्रशांत कोळी, सोमनाथ माळी,सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमुख गजानन चव्हाण, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध शाखांचे प्रमुख, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सचिन गुदगे पुढे म्हणाले,प्लॅस्टिक हे आरोग्यास हानीकारक आहे हे माहित असून देखील जाणते -अजाणतेपणे त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही.त्यामुळे विविध प्रदूषणांना सामोरे जावे लागते व त्याचा विपरीत परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत असतो .शासनाने प्लास्टिक बंदी केली म्हणून प्लास्टिकचा वापर टाळण्यापेक्षा एक जागरूक नागरिक म्हणून प्लास्टिक बंदीला सर्वांनी सहकार्य करणे महत्त्वाचे आहे .प्लॅस्टिक बंदीच्या शासकीय निर्णयात मायणी ग्रामपंचायत देखील सहभागी होणार आहे .ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थ व व्यावसायिकांना प्लास्टिक बंदीच्या कार्यवाही संदर्भात निवेदने दिले जाणार आहे .नागरिकांनी प्लास्टिक बंदी टाळून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा ग्रामपंचायती मार्फत कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी गुदगे यांनी दिला .ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना लवकरात लवकर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे . प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवावे त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मोफत रोपांचे वाटप करण्यात येईल.

सामाजिक वनीकरण विभागाचे गजानन चव्हाण उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, महाराष्ट्र शासनामार्फत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे .त्यापैकी गतवर्षी ४ कोटी, या वर्षी ते टा कोटी व उर्वरित ३३ कोटी वृक्षांची लागवड पुढील वर्षी करून या उपक्रमाची सांगता होणार आहे .खटाव तालुक्यात ७ ठिकाणी १ लाख २६हजार व मायणी विभागात ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे .पर्यावरणाचा ऱ्हास, वेळी अवेळी पाऊस ,तापमानात वाढ होण्याची कारणे वृक्षांची संख्या कमी असणे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीस सहकार्यकरावे .

तत्पूर्वीशालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात डोक्यावर वृक्षांची रोपे घेऊन व झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टीक बंदी काळाची गरज अशाप्रकारच्या घोषणा देत पारंपरिक पोशाखात संपूर्ण गावातून व विविध वाद्यांच्या साथीत भव्यदिव्य अशाप्रकारची वृक्षदिंडी काढली . भगतसिंग हायस्कूल व अनंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी- विद्यार्थींनींनी प्लॅस्टिक बंदी व वृक्षारोपण संदर्भात सादर केलेल्या पथनाट्याने सर्व नागरिकांची मने जिंकून घेतली .ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या वृक्ष दिंडीत सजवलेल्या बैलगाडीत अनेक वृक्षांची रोपे ठेवण्यात आली . गाडीवर स्वतः सरपंच सचिन गुदगे व उपसरपंच सुरज पाटील बैलगाडीत उभे राहून यात सहभागी झाले होते .

No comments

Powered by Blogger.