Your Own Digital Platform

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप


सातारा (जिमाका) : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 13 ते 17 जुलै दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून आज पालखी सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे आज धर्मपुरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत करण्यात आली. यानंतर पालखी सोहळ्या दरम्यान काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दि. 13 ते 17 जुलै 2018 या कालावधीत जिल्ह्यातून मार्गक्रमण केले. या कालावधीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून उत्कृष्टरित्या पालखीचे नियोजन केले. वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही ही आपल्या कामाची पोच पावती असून विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

पोलीस प्रशासनावर नेहमीच कामाचा ताण असतो. तो ताण विसरुन पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने पालखी सोहळ्यादरम्यान बंदोबस्त ठेवला कुठल्याही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली. यापुढेही पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अशा पद्धतीने चांगले काम करतील, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

पालखी सोहळा प्रमुखांनी अतिशय योग्य व्यवस्था केली असल्याचे सांगून फलटण विमानतळावर यावर्षी मुरुम टाकून सपाटीकरण केल्यामुळे यावर्षी पाऊस होवूनही चिखल झाला नाही, याबद्दलही प्रशासनाचे पालखी सोहळा पदाधिका-यांनी आभार मानले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.