विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते जीर्ण होत नाही : सारंग पाटीलमल्हारपेठ : विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्ञानाचे दान हे कधीही जीर्ण होत नाही. हे दान देण्याचे काम शिक्षकांच्या नशिबात असून शिक्षकच ज्ञानी पिढी घडवत असतो. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील यांनी केले.

वसंतगड ( ता. कराड ) येथील श्री विठ्ठल गणोजी माने हायस्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या नवागतांचे स्वागत व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयतचे संचालक शिवाजी गायकवाड, आर. वाय. नलवडे, माणिकराव पवार, मुख्याध्यापक एस. के. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सारंग पाटील म्हणाले, शिक्षकांच्यावर फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. त्यातून त्यांना शिक्षक म्हणून पुण्य करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम ते करत असतात. दुस-याला दिलेले ज्ञानाचे दान कधीही जीर्ण होत नाही. इतर कोणतेही दान केले तरी तेकायमस्वरूपी टिकाऊ नाही. मात्र मिळालेले ज्ञान हे आपल्या सोबत शेवटपर्यंत राहते.

 त्यामुळे ज्ञानदान हे सर्वात मोठे दान आहे. ते देण्याचे काम शिक्षकांच्या नशिबात असल्याने ते पुण्यवान आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आता कशातही कमी पडत नाहीत. विपरीत परिस्थितीत शिकून ते यश मिळवत आहेत. परंतु पालक व समाज म्हणून आपण त्यांना काय देतो ? हे पाहणेही गरजेचे आहे. मुलांची आवड, त्यांचा कल पाहून त्यांना पुढील मार्ग दाखवावा. 

त्यांच्या अंगभूत गुणांना वाव दिला गेला पाहिजे. पालक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना समाजाने हात दिल्यास त्या मदतीच्या जाणीव पुढील पिढी नक्की ठेवेल. ती पिढी मोठी झाल्यावर आपल्या समाजाला कधीही विसरणार नाही. तर झालेल्या मदतीची परतफेड ती नक्कीच करते. त्यामुळे नैतिक, सामाजिक बांधिलकी जपत संस्कारक्षम विद्यार्थी घडविले पाहिजेत.

दरम्यान सारंग पाटील यांच्या हस्ते पुस्तके देऊन नवीन विद्यार्थींचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या मैदानात वृक्षारोपन करण्यात आले. प्रारंभी स्वागत अर्जुन कळंबे यांनी केले. प्रास्ताविक मंदार दिक्षित यांनी तर आभार ए.ए. काटकर यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.