Your Own Digital Platform

'एफआरपी'च्या हिशोबात घोळ; शेट्टींचा आरोप


कराड  : केंद्र सरकारने उसाची एफआरपी वाढवताना एफआरपीच्या टक्केवारीच्या सूत्राबाबत छेडछाड केली आहे. दोनशे रूपयांची घोषणा करत हिशोबात घोळ घालण्यात आला असून शेतकऱ्यांचा प्रतिटन १४५ रूपये तोटा करण्यात आला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना केवळ ५५ रूपयांचीच वाढीव एफआरपी मिळणार आहे. 

त्यामुळेच भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा पुनरूच्चार स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच निवडणुकीत ‘कमळा’वर कोणते तणनाशक आता फवारावे हे ठरवावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. कराडमध्ये शेट्टी यांचे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले.

तसेच दूध आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतल्याबद्दल काहीजण नाक मुरडत आहेत. पण त्याचवेळी बहुतांश शेतकऱ्यांनी दुधाचे वाटप केले आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. तसेच दूध रस्त्यावर ओतण्याचे समर्थन करताना रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराला अभिषेक घालण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचा टोला शेट्टी यांनी लगाविला आहे.

पुढील वर्षीच्या निवडणुकीत भाजपला विरोधी बाकावर बसावे लागेल, असा इशाराही यावेळी दिला.