Your Own Digital Platform

रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा


पुसेसावळी : 
पुसेसावळी ते मांडवे शिवार गणेशवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असुन मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पुसेसावळी गावापासून उत्तरेस दोन किमी अंतरावर मांडवे शिवार वस्ती आहे. वस्तीची लोकसंख्या पाचशे असून त्यांना गावामध्ये येण्यासाठी दक्षिणोत्तर पुसेसावळी गणेशवाडी असा रस्ता आहे. 2005 मध्ये पुसेसावळी ते मांडवे शिवार या दोन किमी रस्त्यापैकी फक्त सहाशे मीटर एवढाच रस्ता डांबरीकरण झाला आहे. हा रस्ताही पूर्णपणे उखडलेला असून उर्वरीत रस्ताही निकृष्ठ दर्जाचा झाला आहे. पावसाळ्यात येण्या-जाण्या लायक राहिला नाही. मात्र पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना या रस्त्यावरून जावे लागत आहे.

..अन्यथा 26 पासून बेमुदत उपोषण

गेल्या कित्येक वर्षांपासून शाळकरी मुले, अबालवृद्ध यांना या रस्त्याने जाणे जिकिरीचे झाले आहे. वाहन चालविणे, शेतमाल ने-आण, उस वाहतूक अशक्‍यप्राय झाले आहे. रस्ता दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी सर्व शासकीय व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना वारंवार अर्ज, निवेदन देवूनही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ पुसेसावळी गणेशवाडी रस्त्यावर मांडवे शिवार येथे दि. 26 रोजी बेमुदत उपोषणास बसणार आहेत.