Your Own Digital Platform

पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती विरोधात अविश्वास ठराव


वडूज : खटाव पंचायत समितीचे सभापती, उपसभपती यांच्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या सहा नाराज सदस्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे अविश्वास दाखल केल्यानंतर तालुक्‍यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पदाधिकारी राजीनामा देणार की बंड करणार याविषयी चर्चा सुरू झाली असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे तालुक्‍यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

खटाव पंचायत समितीत राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत असून बारा पैकी राष्ट्रवादीचे आठ, कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. बहुमत असताना पक्षातील सहा सदस्यांनी अविश्वास दाखल केला आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिघल यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या ठरावावर हिराचंद पवार, कल्पना मोरे, जयश्री कदम, रेखा घाडगे, संतोष साळुंखे, आनंद भोंडवे यांच्या सह्या आहेत. याप्रकारामुळे पक्षाची नाचक्की झाली असून वरीष्ठ नेते याबाबत काय निर्णय घेतात याकडे नजरा लागल्या आहेत.

खटाव तालुका, कोरेगाव, माण, कराड उत्तर असा विभागला आहे. सभापतीचा गण माण तर उपसभापतीचा गण कोरेगाव विधानसभा मतदार संघात येतो. सभापती संदीप मांडवे व उपसभापती कैलास घाडगे यांच्यानिवडी वेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. बाळासाहेब पाटील यांनी सदस्यांना प्रत्येकी सव्वा वर्षे संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सव्वावर्ष पूर्ण झाले तरी राजीनामा न दिल्याने अविश्वास आणल्याचे सदस्यांनी सांगितले.

मात्र, सभापती मांडवे व घाडगे यांनी आजपर्यंत पंचायत समितीचे निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना विचाराने घेण्यात आले आहेत. कुणालाही डावलले नाही. सव्वा वर्षांचा निर्णय झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.