कास तलाव भरला


सातारा : सातार्‍याची जलदेवता समजला जाणारा कास तलाव गुरुवारी सकाळी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागला. तलावात 107 दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण झाला आहे. तलावातून 135 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पाणी कपातीची शक्यता असताना तलाव आठ दिवसांत भरल्याने सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आणि सातारा पालिका कारभार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

सातारा शहरास कास पाणीपुरवठा योजना, शहापूर उद्भव पाणीयोजना तसेच कृष्णा उद्भव पाणीयोजना या तीन पाणी योजनांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शुक्रवार पेठ व व्यंकटपुरा पेठ परिसरास महादरे तलावातून घरगुती वापरासाठी पाणी दिले जाते. मात्र, महादरे तलावातील पाणी आटल्यानंतर या पेठांना कास योजनेशिवाय पर्याय राहत नाही. कास पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या जुन्या भागास पिण्यासाठी पाणी दिले जाते. त्यामध्ये मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, शुक्रवार पेठ, रामाचा गोट, शनिवार पेठ, यादोगोपाळ पेठ, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बोगदा परिसर याशिवाय कास जलवाहिनीच्या मार्गावर असणार्‍या सुमारे 14 गावांनाही पाणी दिले जाते.

यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने कास तलाव लवकर भरेल, हा अंदाज फोल ठरला. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पूर्वेकडील तालुक्यात धुमाकूळ घातला असताना सातारा तालुक्याच्या पश्‍चिमेस मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे कास तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत होता. पंधरा दिवसांपूर्वी कास तलावात 21 पैकी 7 फूट इतकीच पाणीपातळी शिल्‍लक होती. तीन फूट पाणीच जॅकवेलद्वारे येणार होते. हे पाणी काही दिवसच पुरणार होते. कास परिसरात होत असलेल्या बांधकामांनाही पाण्याची मागणी होत आहे. त्याठिकाणी नवी नळकनेक्शन द्यावी लागत आहेत. त्यामुळे या योजनेवरील अवलंबितांची पठारावरील संख्या मोठी होती. भविष्यात धोका नको म्हणून यावर्षी एक दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णयही पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. त्याला विरोध झाला.

मात्र, गेली आठ दिवसांपासून कास तलाव पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. त्यामुळे मागील शनिवारी तलावाची पाणीपातळी 14 फूट होती. तलाव परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप वाढल्याने पाणीपातळी वाढली. गुरुवारी सकाळी 9. 15 वाजण्याच्या सुमारास तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले. थोड्याच वेळात कास तलाव दुथडी भरुन वाहू लागला. मागील वर्षी 1 जुलै रोजीच तलाव भरला होता. यावर्षी तलाव 4 दिवस उशिरा भरला. तलाव पूर्णक्षमतेने भरल्याने 21 फूट म्हणजेच 106 चौरस घनफूट पाणीसाठा झाला आहे. दोन महिन्यांनी तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी 3 फूट उंचीच्या लाकडी फळ्या बसवून अडवले जाणार आहे. त्यामुळे पाणीपातळी 24 फूट होणार आहे.

दरम्यान, तलाव भरल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी कास तलाव पाण्याचे पूजन केले जाते. सातारा पालिकेला कास तलावाच्या ओटीभरणाचे वेध लागले आहेत. आठ-दिवसांत हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

दरम्यान, कास तलाव भरल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी माहिती घेतली. सध्या कास तलाव उंची वाढवण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हे काम तात्पुरते बंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. याबाबत पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्याकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला.

No comments

Powered by Blogger.