Your Own Digital Platform

उद्यापासून वाहतूकदारांचा देशव्यापी चक्काजाम


सातारा : देशात प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेलच्या दरात 13 रूपयांचा फरक आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायिक अडचणीत आला असून सरकारने देशात इंधनाचे दर समान करावेत, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य प्रकाश गवळी यांनी केली. तसेच वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यासह संपुर्ण देशभरात दि.20 जुलैपासून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्काजाम आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक संघटनेचे जगनशेठ जाधव, अविनाश कदम, धनंजय कुलकर्णी, गोलु साळुंखे, अस्लमशेठ कुरेशी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गवळी म्हणाले, देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सेस कर 15 टक्के तर राज्याचा कर 54 टक्के आहे. त्यातच टोल दराची वाढ, इन्शुरन्स व परिवहन विभागाचा रस्ता कर हे पाहता वाहतूकदार पुर्णत: अडचणीत आलेला आहे. वास्तविक वाहतूकदार हे सरकारला कर देण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. असे असताना सरकारकडून त्यांना कोणतीही सवलत व सुविधा दिली जात नाही. देशातील 20 कोटी लोक या व्यवसायाशी निगडित आहेत. 

टोलनाक्‍यांवर वाहने थांबविल्यामुळे रोज देशात 1 कोटी 60 लाख रूपयांचे डिझेल वाया जात आहे. टोल नाके वाहतूकदारांना कोणताही सुविधा देत नाहीत. त्यामुळे सरकारने टोल बंद करावा. तसेच थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये ही अनेक पटीने वाढ केली आहे. मात्र, वाहतूकदारांना त्याचा कोणताही फायदा दिला जात नाही. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा, टोल नाके बंद करा व इन्शुरन्सच्या वाढीमध्ये घट करा तसेच यापुर्वी घेतलेल्या इन्शुरन्सचे पैसे परत द्या या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन होणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.