Your Own Digital Platform

आनेवाडी वीजवितरणचा भोंगळ कारभार
विरमाडे : वीज वितरणच्या आनेवाडी फिडरमध्ये समाविष्ट असलेल्या मर्ढे गावातील एक ट्रान्सफॉर्मर गत महिनाभरापासून बंद आहे. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी वीज वितरणकडे वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारीदेखील दिल्या आहेत. मात्र, वीज वितरणकडून तक्रारदारांना हिनदर्जाच्या वागणुकीखेरीज काहीच मिळाले नाही. बंद ट्रान्सफॉर्मरशी निगडीत वस्तीवरील लोकांना वीज नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एकंदरित आनेवाडी फिडरमध्ये वीज वितरणचा दिशाहिन कारभार सुरु असल्याचेच चित्र आहे.

मढे हे गाव मुळात सातारा तालुक्‍यातील. मर्ढेसाठी विधानसभा मतदार संघ कोरेगाव तालुका. आणि वीज वितरणचा संबंध जावली तालुक्‍याशी, अशी काहीशी विचित्र परिस्थिती मर्ढे ग्रामस्थांवर ओढावली आहे. सध्या या गावातील विमुक्त समाजाची वस्ती असलेल्या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर गत महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवर असलेले शेतीपंपदेखील बंद आहेत. त्यातच याठिकाणी वसलेल्या वस्तीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारीदेखील वीज नसल्याने बंद आहेत.

 त्यामुळे येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात चिखल तुडवत पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ट्रान्सफॉर्मर बंद असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांनी आनेवाडी येथील कार्यालयात वारंवार दिल्या आहेत. मात्र, वीज वितरणच्या कर्मचाऱ्याला या ट्रान्सफॉर्मरचे वावडे आहे की काय? म्हणून एकही कर्मचारी महिनाभरापासून या ट्रान्सफॉर्मरकडे फिरकलादेखील नाही. कार्यालयात बसूनच तो ट्रान्सफॉर्मर अडचणीत आहे, खांबावर चढायला कर्मचारी नाही, कर्मचाऱ्यांची संख्या कमी, आत्ता साहेब नाहीत, साहेब आल्यावर बघू अशी एका ना अनेक उत्तरे तक्रारदारांना दिली जात आहेत. विद्युत वितरणच्या या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ विद्युत वितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन बंद अवस्थेत असलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.