दूध दरासाठी दि. १६ रोजीपासून स्वाभिमानीचे आंदोलन


सातारा : दुधाला पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी भाव आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दि. १६ रोजी लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने दूध बंद आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

साताऱ्यात झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, राजू शेळके, शंकर शिंदे, अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, रविंद्र घाडगे, रमेश पिसाळ, संजय साबळे आदी उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी यांनी दि. २९ जुन रोजी पुणे येथील मोर्चात दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली होती. या आंदोलनासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली.

आज शेतकऱ्याच्या दुधाला बिसलरीपेक्षा पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी किंमत मिळत आहे. दूध १४ रुपये लिटर तर पाणी २० ते २५ रुपये लिटर आहे. शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी दुभती जनावरे पाळत असतो. ६० ते ७० हजार रुपये कर्ज काढून गाई, म्हैशी घेतो. परंतु दुधाचा उत्पादन खर्च कमी केला तरी परवडत नसून शेतकरी हा आतबट्ट्याचा व्यवसाय करत आहेत. 

गाई, म्हैशीचा चारा, पशु खाद्य यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. सरकारने कमी दर देणाऱ्या दूध संघावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले नाही. दूध घेणाऱ्या ग्राहकाला ५२ रुपये लिटरच्या भावाने दूध घ्यावे लागते. दूध उत्पादक व सामान्य ग्राहक या दोघांनाही तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना दुधाला ५ रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करत आहे. शेतकऱ्यांमध्ये जावून संघटनेची भूमिका सांगण्यात येणार असून दि.१६ रोजी दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. १६ रोजी निर्णय झाला नाही तर १७ पासून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ठराव यावेळी करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.