Your Own Digital Platform

येळगावमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन


येळगाव : येळगाव, येणपे, येवती, म्हासोली, लटकेवाडीसह परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी रात्री येळगाव फाटा परिसरात पाळीव कुत्र्याला बिबट्याने लक्ष केले. तर गुरूवारी रात्री याच परिसरात स्थानिक लोकांना दोन बिबट्यांचे दर्शन घडले. या दोन्ही घटनांमुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दुर्गम व डोंगरी विभाग अशी कराड तालुक्यात येळगाव, लटकेवाडीसह परिसराची ओळख आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून सातत्याने अनेकदा बिबट्याचे दर्शन स्थानिक लोकांना होते. चोरमारवाडी येथे एका घरातही बिबट्या दबा धरून रात्रभर बसला होता. गेल्यावर्षीच्या या घटनेनंतर घोगाव, टाळगाव, येवती या गावांच्या परिसरात शेळ्या, जनावरांसह कुत्र्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत.

असाच प्रकार येळगाव फाटा परिसरात बाजीराव शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अनुभवास मिळाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास शेवाळे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडून तेथून पळ काढला. त्याचवेळी येळगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील घोगाव येथील सुभाष डिसले यांच्या कुत्र्याला ठार करण्यात बिबट्याला यश आले.

या घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी राहुल मारूती शेवाळे हे आपल्या दुचाकीवरुन रात्री उशिरा येळगावला येत असताना येळगाव फाट्यावर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी संदीप येळवे, गणेश सावर्डेकर, शिवाजी पाटील, प्रताप शेवाळे, सुहेल सावर्डेकर यांच्यासह काहीजण चारचाकी गाडीतून पुन्हा येळगाव फाटा परिसरात आले असता त्यांना एक नव्हे तर दोन बिबटे जंगलात जाताना दिसले.