कृष्णानगर पाटबंधारे वसाहतीत कावीळ साथ


खेड : कृष्णानगर येथील पाटबंधारे वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे काविळीची साथ फैलावली असून, सुमारे 10 जणांना लागण झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. यात रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून अद्यापही आरोग्य विभागाला जाग आली नाही. दूषित पाण्याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना सांगूनही गांधारीची भूमिका घेतल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कृष्णानगर येथे पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांसाठी सुमारे 80 हून अधिक निवासस्थाने आहेत. अनेक निवासस्थानांची पडझड झाली असली तरी तेथे सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिक वास्तव्यास आहेत. या वसाहतीमधील नागरिकांना विसावा जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे सिंचन भवन कार्यालयासमोर असलेल्या पाण्याच्या मोठ्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून वसाहतीमधील नागरिकांना दुर्गंधीयुक्‍त पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले. अधिकार्‍यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचार्‍यांना याबाबतची माहिती दिली. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आता तर दुर्गंधीयुक्‍त पाण्यासह छोट्या आळ्या, कचराही येवू लागला आहे. अनेक नागरिकांची जुलाब, उलट्या अतिसारामुळे प्रकृती बिघडली. काही नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुमारे 10 जणांना काविळीची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. यातील दोन जणांना अधिक उपचारासाठी पुण्याला नेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या तब्बेतीत बिघाड होत असल्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देवूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे तर आरोग्य विभागाने अद्यापही तपासणी मोहीम सुरु केली नाही. गटारातील फुटलेल्या जलवाहिनीतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगूनही प्राधिकरणाने कोणतीच उपाययोजना केलेली नाही. यामुळे दिवसेंदिवस नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असून यावर मात करण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी आणावे लागत आहे. या प्रकारामुळे कृष्णानगर वसाहतीमधील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने दूषित पाणी पुरवठ्याचा शोध घ्यावा तसेच आरोग्य विभागाने वसाहतीमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी तपासणी मोहीम तातडीने सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गंजलेली झाकणे...अन् घाणीचे साम्राज्य

कृष्णानगर येथील सिंचन भवनसमोरील जलकुंभातून वसाहतीला पाणीपुरवठा होत आहे. या टाकीच्या बांधकामाच्या स्लॅबचे सिमेंट ढासळले आहे. झाकणे गंजलेल्या स्थितीत असून परिसरात गवत व घाणीचे साम्राज्य आहे. अनेक जलवाहिन्या गटारातून गेल्या असून ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. गटारातील सांडपाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे.

No comments

Powered by Blogger.