Your Own Digital Platform

दहिवडी पोलीसांकडून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न


बिजवडी : दूधदरवाढी संदर्भात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. बिजवडी येथे गुरुवारी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. दरमयान, बिजवडीत दि. 18 रोजी आंदोलन झाले नसतानाही दहिवडी पोलिसांनी दडपशाहीने एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेख्या वतीने करण्यात आला आहे.

बिजवडी, ता. माण येथे दि. 19 रोजी सकाळी 9 वाजता दूध दरवाढीच्या मागणीसाठी आणि आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, विजय गंगाराम भोसले, दिलीपराव भोसले, रंगाशेठ भोसले, डॉ. विलास पवार, संजय विठोबा भोसले, विजय रामहरी भोसले, तात्याबा भोसले, संतोष भोसले, प्रशांत विरकर, जोतिराम जाधव, माजी सरपंच यशवंत गाढवे, यशवंत शिनगारे, नानासो जगदाळे, आबासो यादव तसेच शेतकरी उपस्थित होते.यावेळी पोलिसांनी दूधाचे कॅन ओढण्याचा प्रयत्न करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत असल्याची माहिती भोसले यांनी दिली. याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार पोटे यांना देण्यात आले आहे.

यावेळी संजय भोसले म्हणाले, शासनाच्या चूकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दूधदरवाढीतही शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. या प्रश्नासंदर्भात बिजवडी परिसरातील दहा गावांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले आहे. दूग्धविकास मंत्री हे माण तालुक्‍याचे सुपूत्र असूनही त्यांना शेतकऱ्यांचे काही पडले नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही करत गुन्हे नोंद केले जात आहेत. पोलीस प्रशासनही मंत्र्याच्या दावणीला बांधल्याप्रमाणे अन्याय करत आहे.