Your Own Digital Platform

राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे खिरापतीसारखे वाटप


खटाव : विधेयकांमध्ये सुधारणा करुन महामंडळांची विविध पदे निर्माण करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. उपाध्यक्षपदासह निर्माण केली जाणारी इतर पदे भाजपाच्या कार्यकर्त्यांची झगमगाटात वावरण्याची सोय म्हणून केली जाऊ नयेत. महामंडळांकडून राज्याच्या हिताची कामे व्हावीत. त्या पदांवर अनुभवी व्यक्तींची निवड करा तरच जलसंधारणाची कामे चांगली होतील, असे मत आ. जयकुमार गोरे यांनी मांडले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात भाजप सरकारने आणलेल्या महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियममध्ये सुधारणा करण्याच्या विधेयकावर चर्चा करताना ते विधिमंडळ सभागृहात बोलत होते.

आ. गोरे पुढे म्हणाले, राज्य सरकारने पाठिमागच्या सरकारने सुरु केलेल्या योजनेचे नाव बदलून जलयुक्त शिवारही योजना सुरु केली आहे. दरवर्षी पाच हजार गावे जलयुक्त तसेच टॅंकरमुक्त झाल्याची चुकीची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. योजनेला सरकारकडून पुरेसा निधी मिळत नाही. आता तर ही योजना पानी फाऊंडेशनची वॉटरकप स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावोगावी जलसंधारणाचे तुफान आले आहे. लोकसहभाग, सामाजिक संस्थांकडून चांगली कामे जात आहेत. ही चळवळ चांगली रुजली आहे.

आता सरकारने महामंडळाच्या उपाध्यक्षांची दोन पदे निर्माण करण्याचा आणि सदस्य संख्या वाढवण्याचा घाट घातला आहे. हे सुधारणा विधेयक आणण्याचा हेतू चांगला आहे. पण नवीन पदावर नेमणूक करताना त्या त्या क्षेत्रातील अनुभवाला प्राधान्य देण्यात यावे. साईबाबा, पढरपूर अशा देवस्थान संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रीपदाचा दर्जा देतानाही सरकारने अनुभवाचा निकष लावावा. जलसंधारण महामंडळावर नियुक्‍त्या करताना या क्षेत्रात काम केलेल्यांचाच विचार व्हावा. 

फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांची झगमगाटात वावरण्याची सोय करण्यासाठी पदे निर्माण केली जाऊ नयेत. राज्यमंत्री पदाचा दर्जा खिरापतीसारखा वाटला जातोय. मागे पुढे पोलिसगाड्या, इतर वाहनांचा ताफा असा थाट सुरु झाला आहे. तिकडे मोदी लाल दिवा नको, डामडौल नको असे सांगत आहेत तर इकडे राज्यात भाजपाच्याच कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी महामंडळांची उपाध्यक्षपदे निर्माण केली जात आहेत. पोलिसांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्याऐवजी नको त्या कामासाठी केला जात आहे.

महामंडळाची नवी पदे निर्माण करताना शासनाचे नुकसान होवू नये. चांगल्या व्यक्तींना चांगली कामे करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.