लोकांना भावणारा मेळा
निरपेक्ष व्रत म्हणून अखंडपणे चालवली जाणारी वारी म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण. वारी ही संकल्पनाच पूर्णपणे वेगळी! ‘पांडुरंग हे दैवत, चंद्रभागा तीर्थ तर पंढरी हे क्षेत्र’ या पलीकडे वारकर्यांना काहीही शिरोधार्य नाही. वारीचे ठिकाण, वेळ, तिथी सर्व पूर्वनियोजित असते. चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, हरिनामाचा जप, एवढेच काय विधी! संपूर्ण भारतातील अठरापगड जातींचे सर्व स्तरातील सर्व वयांचे लोक एकत्र आलेले कोठे पहावयाचे असतील तर ते या पंढरीच्या वारीतच !
वारीची परंपरा माऊलींच्याही पूर्वीपासून चालत आली आहे. श्री माऊलींचे पणजोबा श्रीत्र्यंबकपंत आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पांडुरंगाची वारी करत असे. किंबहुना ज्या भागवत धर्माची मुहूर्तमेढ संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी, असेच म्हणावे लागेल.आजच्या पालखी सोहळ्याची परंपरा श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांनी इ.स. 1665 साली सुरू केली. तुकोबारायांच्या पादूका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन श्री माऊलींच्या पादूकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा सुरू झाली. तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांनीच वारी सोहळ्यात आणि सांप्रदायात ज्ञानोबा-तुकाराम या भजनाची प्रथा सुरु केली. हा ऐश्वर्यपूर्ण पालखी सोहळा इ.स. 1685 पासून 1830 पर्यंत एकत्रितपणे सुरु राहिला. त्यानंतर पुढे देहूकर मोरे यांच्या सांगण्यावरुन थोर भागवदभक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे परंतू नंतर विरक्त होऊन आळंदीस वास्तव्यास असलेले श्री गुरु हैबतबाबा यांनी 1831 पासून श्री माऊलींच्या पादूकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली. आज जो पालखी सोहळा आपणास दिसतो, त्याचे हे विशेष स्वरुप श्रीगुरु हैबतबाबा यांनीच सिद्ध केले. सातारा जिल्ह्यातील आरफळ हे श्री गुरु हैबतबाबांचे मूळ गाव. पुढे ग्वालेहरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात हैबतबाबांनी सरदार म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला. त्यानंतर गावाची भेट घडावी या हेतूने लवाजमा व संपत्ती बरोबर घेऊन ते गावी निघाले. मात्र, सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करुन त्यांना बरोबरच्या लोकांसह गुहेमध्ये कोंडून घातले. श्री ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त असणार्या हैबतबाबांनी अहोरात्र चिंतन आणि हरिपाठाचा घोष सुरु केला. योगायोगाने एकविसाव्या दिवशी भिल्ल नायकाची पत्नी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्या आनंदप्रित्यर्थ भिल्ल नायकाने गुहेवरील शिळा दूर केली. तेव्हा हैबतबाबा व अन्य लोक अन्नपाण्याअभावी निश्चेष्ठ पडल्याचे त्याला दिसले. त्या स्थितीतही हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग उमटत होते. हे पाहून भिल्ल नायकाने हैबतबाबांची पूर्ण शुश्रृषा करुन संपत्तीसह त्यांची मुक्तता केली. श्री ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादामुळे आपला जणू पूनर्जन्म झाला. या भावनेने हैबतबाबा आरफळला न जाता थेट आळंदीला आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले. रात्रभर माऊलींच्या समाधीसमोर उभे राहून भजन करण्याचा परिपाठ त्यांनी अखंड जपला. पुढे पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांच्या दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकी सारा सरंजाम आजतागायत सुरु आहे. हैबतबाबा यांचे मूळ पिंड सरदार घराण्याचे असल्याने त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरुप दिले. त्यांना सहकार्य वासकर, सुभानजी शेडगे, खंडोजीबाबा वाडीकर, आजरेकर प्रभूतींचे होते. म्हणून आजही या दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत हैबतबाबा यांनी इ.स. 1831 पासून ज्या प्रकारे सुरु केली तशीच पाळली जाते.
हैबतबाबा यांनी सुरु केलेला हा सोहळा आज त्यांच्या प्रतिनिधींकरवी होतो. त्यांच्या प्रतिनिधींना अतीव आदराने ‘मालक’ असे संबोधले जाते. माऊलींचा जरीपटका, घोडेस्वार आणि अश्व श्रीमंत शितोळे सरकार सेवा म्हणून रुजू करतात. ही सेवा 1831 पासून अखंड सुरु आहे. चोपदार हे पद सोहळा सुरु करण्याच्या आधीपासून विद्यमान आहे. माऊलींच्या चोपदारपदाचा मान रंधवे कुटुंबांकडे आहे. सोहळ्यावर नियंत्रण ठेवणे, रिंगण लावणे, समाजआरतीच्यावेळी दिंडीतील लोकांच्या तक्रारींची नोंद घेणे, आदी जबाबदार्या चोपदारांकडे असतात. सध्या बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, रामभाऊ चोपदार हे हा मान परंपरेनुसार चालवत आहेत. माऊलींच्या पादुकांना वारा घालण्याचा मान वाल्हे येथील मांडके कुटुंबांकडे आहे. वारकर्यांना सूचना देण्यासाठी वाजविण्यात येणार्या कर्ण्याचा मान आळंदी येथील वाघमारे कुटुंबाकडे आहे.
Post a Comment