विजेच्या या उधळपट्टीस जबाबदार कोण?


मायणी : विद्युत पारेषण कंपनी सातत्याने वीज बिलात दरवाढ करीत आहे. मात्र दिवा जळू दे सारी रात या म्हणीऐवजी दिवा जळू दे दिन रात असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या रात्रंदिवस वीजजाळणाऱ्या प्रकारास जबाबदार कोण?वीज कंपनी की स्थानिक प्रशासन अशा प्रकारची चर्चा लोक करताना दिसत आहे.

आज कित्येक गावांमध्ये रस्त्यांवरील वीजेचे दिवे अनेक दिवस रात्रंदिवस जळताना दिसत असतात. मात्र याचे सोयरसूतक ना स्थानिक प्रशासनास, ना वीज पारेषण कंपनीस, ना स्थानिक नागरिकांना. सदर रात्रंदिवस जळणाऱ्या विजेचे बील कोण भरते याची नागरिकांना कल्पना नसल्याने तेही याबाबतीत निश्चिंत असतात. मात्र सदर रस्त्यावरील दिव्यांचे बील हे ग्रामपंचायतीस भरावे लागते. परिणामी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो व जो पैसा गावच्या विकासासाठी वापरावयाचा तो असा वीजेच्या उधळपट्टीवर खर्च होतो व त्याचा गावच्या विकासावर अल्पांशाने का होईना निश्चीतच विपरीत परिणाम होत असतो.

या बाबतीत स्थानिक प्रशासनाने काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांकडून कर रूपाने जमा करण्यात आलेल्या पैशाची अशा प्रकारे नाहकरीत्या उधळपट्टी करणे हे निश्चितच चांगली बाब नाही. या संदर्भात नागरिकांनाही अशा प्रकारे वीजेची होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी सतर्क राहून स्थानिक प्रशासनास याची जाणीव करुन देणे हे आपले कर्तव्य आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे. मात्र मला त्याच्याशी कांही देणे घेणे नाही या आविर्भावात राहणे निश्चितच भूषणावह नाही. गावाच्या विकासासाठी प्रशासन व जनता यांचा योग्य मेळ बसला तर त्याचा गावच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल.

No comments

Powered by Blogger.