जिल्ह्यात दरडी कोसळल्या; यवतेश्‍वर रस्ता खचलासातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे गुरुवारीही पावसाचा जोर आणखी वाढला. धुवाधार पाऊस कोसळल्याने यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचला असून सातारा तालुक्यातील रेवंडी व जावलीतील बामणोलीजवळ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे संबंधित मार्गांवरील वाहतूक कोलमडून पडली. पश्‍चिमेकडील तालुक्यामधील जनजीवन ठप्प झाले असून धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, वाई, जावली, सातारा, पाटण या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला.

विशेषत: डोंगरदर्‍यांमध्ये सकाळपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती. सातारा शहर व परिसरालाही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यात एकूण 282.6 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 25.7 मि.मी. पाऊस झाला आहे.

रेवंडे घाटात वाहतूक बंद

रेवंडे (ता. सातारा )येथील घाटात गुरूवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. साता-यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता रेवंडे भागात जातो. परिसरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घाटात असलेल्या गणेश मंदिरानजीक एका मोठ्या दगडासह दरडीचा भाग मुख्य डांबरी रस्त्यावर कोसळला. त्यामुळे येथील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले. घाट बंद झाल्यामुळे येथील लोकांना 12 किलोमीटरचा वळसा घालून राजापुरी, बोरणे या मार्गे ठोसेघर रस्त्याने साता-याला जावे लागणार आहे.

यवतेश्‍वर घाट धोकादायक

सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्‍वर घाटात गुरुवारी सकाळी रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. यापूर्वी याच घाटात रस्ता खचला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केले होते. त्यानंतर या पावसाळ्यातही घाटातील रस्ता खचल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

बामणोलीजवळ वाहतूक विस्कळीत

पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या कांदाटी खोर्‍यातील तापोळा व बामणोली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने कास बामणोली मार्गावरील फळणी-बामणोली दरम्यान मोठी दरड झाडांसह कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सातार्‍याहून बामणोलीला कामाला जाणार्‍या कर्मचार्‍यांचा खोळंबा झाला. दरम्यान एस.टी चालक, वाहक, प्रवाशी व स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील दरड व झाडे बाजूला केल्याने वाहतूक सुरु झाली. या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या छोट्या मोठ्या दरडी तशाच असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

No comments

Powered by Blogger.