Your Own Digital Platform

सातार्‍यात 233 भूखंडधारकांना नोटीस


सातारा : सातारा नगरपालिकेने शहरातील विविध खुल्या जागा तसेच भूखंड व्यापारी, व्यवसायिक, कर्मचारी तसेच संंबंधित रहिवाशांना भाड्याने दिले. मात्र, या जागा व भूखंडांचे सुमारे 28 लाखांचे भाडे त्यांनी थकवले असून त्यामध्ये बड्यांचा समावेश आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी सातारा पालिकेने 233 जणांना नोटीस धाडली आहे. जागेचे भाडे न भरल्यास संबंधितांकडून जागा, भूखंड काढून घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.सातारा नगरपालिकेच्या मिळकतींची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. 

त्याकडे लक्ष द्यायला पुरेसे मनुष्यबळ नसतानाही नवनवीन मिळकती निर्माण करण्याचा घाट सध्या काही नगरसेवकांनी घातला आहे. नव्या इमारतींच्या बांधकामातील टक्केवारी काढून घेतल्यावर संबंधित मिळकती वार्‍यावर सोडून दिल्या जातात. स्थावर जिंदगी विभागाच्या ताब्यात असणार्‍या या मिळकतींकडे लक्ष देण्याची गरज आहेच. पण या मिळकतींपासून मिळणारे उत्पन्न खालावले आहे. त्यामुळे या विभागाने वसुलीसाठी संबंधितांकडे तगादा लावला आहे. भाड्याने दिलेल्या मिळकतींपासून येणार्‍या जुन्या भाडे थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे.

सातारा नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असताना 1981 ते 1984 या कालावधीत 30-35 वर्षांपूर्वी शहरातील 496 भूखंड तसेच खुल्या जागा व्यापारी, विक्रेते, व्यवसायिक, रहिवाशी यांना भाडेतत्वावर देण्यात आल्या. राधिका रोड तयार करत असताना तेथील काही मिळकतदारांच्या जमिनी रुंदीकरणात गेल्या. त्यामुळे करंजेतील 10 ते 15 जणांना गटई खोक्यासाठी नगरपालिकेने शहरातील इतर रस्त्यांलगत जागा दिली. महावितरणच्या सुमारे 15 ट्रान्सफॉर्मरसाठी व रहिवासासाठी भाडेतत्वावर जागा दिल्या आहेत. सदरबझार येथे विविध ठिकाणी कर्मचारी वसाहतीकरता 20-22 भूखंड देण्यात आले. करंजे वसाहतमध्येही उद्योगधंद्यांसाठी भूखंड त्यावेळी दिले गेले. मात्र, या जागा व भूखंडांचे गेली दहा वर्षांचे भाडे थकले असून वसुलीसाठी स्थावर जिंदगी विभागाने कारवाईची 233 जणांना नोटीस काढली आहे.

महावितरणचे 8 लाख 18 हजार थकले आहेत. करंजे एमआयडीसीतील भूखंडधारकांकडे नगरपालिकेची मोठी थकबाकी आहे. हे भूखंड लिलाव पध्दतीने ठराविक मुदतींसाठी दिले असले तरी मोठी थकबाकी असल्याचे स्थावर जिंदगी विभागातून सांगितले जात आहे. त्यामध्ये महेश करडे 60 हजार, जनार्दन पाटील 22 हजार 176, लतीफ बागवान 31 हजार, विजय महाडिक 92 हजार, उस्मान बागवान 30 हजार, अंबालाल जैन 16 हजार आदिंचा समावेश असल्याचे सातारा पालिकेतून सांगण्यात आले. थकबाकीदारांना दिलेल्या नोटीशीत म्हटले आहे, सातारा नगरपालिकेची भाडेतत्वावर जागा घेतली असून त्याचे जागा भाडे थकले आहे. नोटीस मिळताच मूळ रक्‍कम, व्याज तसेच 18 टक्के सेवा कर दोन दिवसांत नगरपालिकेच्या कोषागार कार्यालयात जमा करावा. तसे न केल्यास संंबंधित भूखंडाची आपणास आवश्यकता नाही, असे समजून आपल्याकडील जागा काढून घेतली जाईल, असा इशारा दिला नगरपालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाने दिला आहे.