अन्यथा वंचित आघाडी 48 जागांवर लढण्यास सक्षम : अशोक सोनोने


सातारा :
घराणेशाही मोडीत काढून वंचित बहुजन समाजातील उमेदवारांना सत्तेत पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ; आमच्यासाठी महाराष्ट्रातील 12 जागांचा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास आघाडीे सर्व 48 जागांवर पक्ष उमेदवार उभा करेल, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिली.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत खंडाईत, अशोक ममाने, दिगंबर सकट, अमित भुईगळ, अमोल पांढरे, गणेश भिसे, सिद्धार्थ खरात उपस्थित होते.

सोनोने पुढे बोलताना म्हणाले, भारिप बहुजन महासंघाने अकोला, वाशीमसह विदर्भात आपले प्राबल्य सिद्ध केले आहे. आता आगामी निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष करण्यास आम्ही उतरणार आहोत. निवडणुकीत आघाडीला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीही जातीयवादी पक्षांसोबत गेले नाहीत म्हणून या निवडणुकीत कॉंग्रेसला प्रस्ताव दिला आहे.

सध्याचे सरकार लोकांना प्यायला शुद्ध पाणी देऊ शकत नाही, सरकारी रुग्णालयांमध्ये लोकांना उपचार मिळत नाहीत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, शेतीमालाला भाव नाही . तसेच राज्यात 10 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आता शेतकऱ्यांची मुले ही आत्महत्या करू लागले आहेत एवढी भयानक स्थिती निर्माण झाली असताना सरकार सर्व स्तरावर निष्क्रिय ठरले आहे. सरकारला जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवता येत नसल्याने त्यांनी आता प्रत्येक जाती-जातींमध्ये भांडणे लावायचे काम सुरू केले आहे, असा आरोप सोनोने यांनी केला.

देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आज सत्तास्थाने ही ठराविक घराण्यांकडेच आहेत. महाराष्ट्रात ठराविक 169 घराणी अशी आहेत की त्यांच्याच घरातील व्यक्ती खासदार, आमदार, जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि सरपंच आहे. घराणेशाही मोडीत काढण्यासाठी व सत्ता खऱ्या अर्थाने वंचित बहुजनच्या हातात सोपविण्यासाठी आघाडीची स्थापना केली असून सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप व सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते भारिपमध्ये प्रवेश करत आहेत, असे सोनोने यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.