Your Own Digital Platform

पुसेगावात दि. 5 पासून सेवागिरी व्याख्यानमाला


पुसेगाव  : परमपूज्य हनुमानगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्ट, न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मुंबई व बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दि. 5 ते दि. 11 सप्टेंबर कालावधीत दररोज संध्याकाळी 5 वाजता श्रीसेवागिरी व्याख्यानमाला आयोजित केली असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

बुधवार, दि. 5 रोजी सायंकाळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. “प्रशासकीय सेवेतून समाजकार्य” विषयावरील व्याख्यानाने देशमुख व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफणार आहेत.

दि. 6 रोजी सायली गोडबोले-जोशी (पुणे) यांचे “भारतीय स्त्री अस्मिता” विषयावर व शुक्रवारी (ता. 7) पुणे येथील जेष्ठ राजकीय विश्‍लेषक भाऊ तोरसेकर याचे “आपण अशी सरकारे का निवडतो?” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. 8 रोजी उस्मानाबाद येथील ऍड. राज कुलकर्णी यांचे “नेहरुंना समजाऊन घेताना” या विषयावर, दि. 9 रोजी कुंडल ता. पलूस येथील ग्रामीण कथाकथनकार जयवंत आवटे यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. 22 पुणे येथील इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे “शिवरायांची राजनिती” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि. 11 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो सर्वधर्म परिषदेतील भाषणाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आहे. यानिमित्ताने आयोजित डॉ. सुरेंद्रकुमार काटकर यांच्या “स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य” या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता परमपूज्य हनुमानगिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ समाधीस महाअभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी सांगितले.