आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस


ओझर्डे  :  वारंवार एसटीची मागणी करुनही स्वतंत्र एसटी सुरु केली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांसह खानापूर ग्रामस्थांनी सोमवारी वाई आगाराच्या एसटी बसेस रोखल्या. वाई आगाराने स्वतंत्र वाई ते खानापूर एसटीसेवा सुरु करावी, अन्यथा दररोज एसटी रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खानापूर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी दिला.

वाठार ते वाई ही एसटी ओझर्डे, खानापूर या मार्गाने वाई येथे येते. वाठारहुन येत असताना ही एसटी ओझर्डे येथेच प्रवाशांनी फुल्ल होत असते. त्यामुळे खानापूर येथील ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एसटी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एसटीचा पास असतानाही एसटी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत खानापूर ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांनी वारंवार वाई आगाराकडे खानापूर ते वाई अशी स्वतंत्र एसटी सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र आगार व्यवस्थापनाकडून ग्रामस्थांच्या या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह सोमवारी सकाळी वाई आगाराच्या एसटी बसेस अडवूण धरल्या. एसटी अडविल्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

वाई आगार व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करुनही स्वतंत्र एसटी सेवा सुरु होत नसल्याने खानापूर ग्रामस्थांनी सोमवारी एसटी रोको आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी वाई आगाराने तात्काळ स्वतंत्र एसटी सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी आगार व्यवस्थापनाने ग्रामस्थांनी मागणी धुडकावल्यास वाई आगाराच्या एसटी बसेस दररोज रोखण्याचा इशारा खानापूर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी दिला.