महाबळेश्‍वरात भर पावसात मोर्चा
महाबळेश्वर : आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतिदिनी मराठा बांधवानी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. पाऊस व धुक्‍यात देखील शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांना कोणताही त्रास, गैरसोय होऊ नये या हेतूने सकल मराठा समाजाच्या वतीने येथील मुख्य बाजारपेठ बंद न करता शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी जननी माता मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. क्रांतिदिनीं होणाऱ्या आंदोलनाच्या दृष्टीने बुधवारी महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पो. ना. दत्तात्रय नाळे यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात अली होती. 

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी महाबळेश्वरमधील सकल मराठा बांधवांनी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात कोळी अळी येथील जननीमाता मंदिरापासून झाली. हा मोर्चा शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, सुभाष चौक, एसटी स्थानक, पंचायत समिती मार्गे तहसीलदार कार्यालयावर गेला. यावेळी मराठा बांधवानी “”छ. शिवाजी महाराज की जय”, “”एक मराठा लाख मराठा”, “”आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं ” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पाऊस व धुक्‍क्‍यात देखील मोर्चात शेकडो मराठा बांधवांसह विविध पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तहसीलदार कार्यालय परिसरात मोर्चा आल्यावर मराठा बांधवांनी भर पाऊस व धुक्‍यात ठिय्या आंदोलन केले. तद्‌नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थित भगिनींच्या हस्ते तहसीलदार रमेश शेंडगे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर मोर्चाची सांगता झाली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर एकही बस महाबळेश्वर आगारातून गेली नसल्याची माहिती आगार व्यवस्थापक एन.पी.पतंगे यांनी दिली. मोर्चा शांततेत पार पडावा व कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्थ ठेवण्यात आला होता.

No comments

Powered by Blogger.